सोलापूर : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी कोरोनाची लस आज बुधवारी (ता.१३) सायंकाळी सात ते आठच्या सुमारास सोलापुरात दाखल होणार आहे. १६ जानेवारीपासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील १६ ठिकाणी दररोज १०० जणांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
त्याप्रमाणे जिल्हा आरोग्य विभाग लसीकरण करण्यासाठी सज्ज झाला आहे. शहर आणि जिल्ह्यात अठरा बूथ निश्चित करण्यात आले आहेत. या बूथवरून प्रत्यक्ष लसीकरण करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. लसीकरणासाठी पुण्यातून बुधवारी लस घेऊन गाडी सोलापुरात पोहोचेल. सिव्हिल हॉस्पिटलमधून संबंधित बूथवर ही लस १६ जानेवारी रोजी निर्धारित केलेल्या वेळेत पोहोचवली जाईल. लसीकरणासाठी लागणारी सर्व साधनसामग्री लवकरच केंद्रावर पोहोच करण्यात येणार आहे.
कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आज (बुधवारी) सोलापुरात दाखल होणार आहे. ही लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात ठेवली जाणार आहे. त्याची व्यवस्था १६ केंद्रांवर करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर शहर- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होऊ लागला आहे. आतापर्यंत शहरातील ११ हजार ३५० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. तर जिल्ह्यातील ३८ हजार ६७८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. सुरवातीच्या काळात सोलापूर शहराचा मृत्यूदर देशातील टॉपटेन शहरांमध्ये होता. आता मृत्यूचे प्रमाण घटले असले तरीही, अद्याप पूर्णपणे कमी झालेले नाही.
त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनंतर फ्रंट लाईनवर काम करणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी, प्रतिबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. त्याची संपूर्ण माहिती ऑनलाइन भरली जाणार आहे. लसीकरण ऐच्छिक असून ज्यांना लस टोचायली आहे, त्यांना मोफत लस दिली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात आज लस येणार असून ती लस प्रत्येक लसीकरणाच्या केंद्रांवर पोहचविली जाणार आहे.
सोलापूर शहरातील सर्वोपचार रुग्णालयासह चार नागरी आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. शहर- जिल्ह्यात लसीकरणासाठी एकूण १६ केंद्रे निश्चित केली आहेत. गरज पडल्यास जनजागृतीसाठी शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी दिली.
कोरोनाची लस सुरक्षित आहे, याची खात्री सर्वांना पटावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन व प्रमुख अधिकाऱ्यांना पहिल्यांदा ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर लसीकरणास प्रारंभ केला जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी सांगितले.