नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने गायीच्या शेणापासून निर्मित रंग देशांतर्गत बाजारपेठेत सादर केला. गायीच्या शेणापासून निर्मित या रंगाचे नामकरण ‘खादी प्राकृतिक पेंट’ असे करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या रंगाची निर्मिती जयपूरमधील ‘कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट’ने केली असून, ‘खादी आणि ग्रामोद्योग मंडळा’मार्फत (केव्हीआयसी) विक्री करण्यात येणार आहे. या रंगाला ‘भारतीय मानक ब्यूरो’नेही (बीआयएस) प्रमाणित केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भिंतीवर लावल्यानंतर हा रंग केवळ चार तासांतच वाळतो. सध्या दोन लिटरपासून ३० लिटरपर्यंतचे रंगाचे पॅकिंग करण्यात आल्याचे ‘केव्हीआयसी’तर्फे स्पष्ट करण्यात आले.
* शेणाच्या मागणीत होईल वाढ
सध्या बाजारात अस्तित्वात असलेल्या रंगांच्या तुलनेत ‘खादी प्राकृतिक पेंट’ खूपच स्वस्त आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थानिक स्तरावरच या रंगाचे उत्पादन करण्यात येणार असल्याने तो स्वस्तात उपलब्ध होईल, असेही ‘केव्हीआयसी’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेणाच्या मागणीत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ‘केव्हीआयसी’च्या अंदाजानुसार ‘खादी प्राकृतिक पेंट’ मुळे शेतकरी आणि गोशाळांना दर वर्षी प्रति जनावर ३०,००० रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.
* पर्यावरणपूरक, बिनविषारी रंग
हा रंग पर्यावरणपूरक, बिनविषारी, विषाणू आणि बुरशीविरहित असल्याचा दावा ‘खादी आणि ग्रामोद्योग मंडळा’ने केला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा रंग वासरहित असून, तो डिस्टेम्पर आणि इमल्शन पेंट या दोन प्रकारांत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ‘केव्हीआयसी’ने केलेल्या दाव्यानुसार या रंगामध्ये शिसे, पारा, कॅडमियम आणि क्रोमियमसारख्या घातक धातूंचा वापर करण्यात आलेला नाही. ‘खादी प्राकृतिक पेंट’चे परीक्षण मुंबई आणि गाझियाबादमधील ‘नॅशनल टेस्ट हाउस’ आणि नवी दिल्लीतील श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रीसर्च येथे करण्यात आले आहे.