मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करताना पोलिसांच्या तपास पथकात एखाद्या महिला अधिकाऱ्याचा समावेश असावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
पोलीस विभाग त्यांची चौकशी करेल. त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. मात्र, ही चौकशी करताना तपास पथकात एखादी एसीपी दर्जाची महिला अधिकारी त्यामध्ये असावी. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह इतरांची माहिती घेऊन याप्रकरणातील वस्तुस्थिती पुढे आणावी. पोलिसांचा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा, असे शरद पवार यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर तक्रारदार महिलेसंदर्भात नवे खुलासे समोर आल्याने या प्रकरणाचे चित्र पूर्णपणे पालटले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज शुक्रवारी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी शरद पवार यांनी या प्रकरणात नव्याने समोर आलेल्या माहितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिक खोलवर जाण्याची गरज आहे. अन्यथा कोणावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, अशा घटनांमुळे आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर लोटायचे, अशी प्रथा पडण्याचा धोका आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत शहानिशा करुनच पुढचे पाऊल टाकू, असे शरद पवार यांनी सांगितले.
“पोलीस विभाग चौकशी करेल. आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी. धनंजय मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी आणि हे प्रकरण नेमकं प्रकरण आणावं. काल बोललो तेव्हा संपूर्ण चित्र समोर नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला, आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं”
– शरद पवार