सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज माघारी का घेतला नाही, याचा राग मनात धरून नंदेश्वर (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे उमेदवाराचा पती व दिरास गंभीर स्वरूपात मारहाण करून जखमी करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात प्रचार का करता, यावरून झालेल्या वादात परस्परविरोधी गटातील 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात दामाजी कारखान्याच्या संचालकासह मातब्बरांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण नरोटे, माजी उपसभापती दादा गरंडे, माजी सरपंच बाळू गरंडे यांचा समावेश आहे. ही घटना काल शुक्रवारी मतदान झाल्यानंतर घडली. पहिल्या घटनेची फिर्याद उमेदवार छाया गरंडे यांनी दिली आहे.
त्या नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग दोनमधून उभ्या होत्या. मंगळवेढा पंचायत समितीचे माजी उपसभापती दादा गरंडे यांनी दोन जानेवारी रोजी “तुमचा अर्ज काढून घ्या; नाहीतर तुमचे काही खरे नाही,’ अशी धमकी दिली होती. या प्रकरणी त्यांनी फिर्याद दिली नव्हती; परंतु शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मतदान
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्रासमोरून उमेदवाराचे पती व दीर जात असताना माजी उपसभापती गरंडे, माजी सरपंच बाळू गरंडे, केराप्पा गरंडे, अंकुश गरंडे, मायाप्पा गरंडे, तायाप्पा गरंडे, ज्ञानू गरंडे, रमेश गरंडे, नामदेव गरंडे हे हातात काठ्या घेऊन आले. उमेदवाराच्या पतीस शिवीगाळ करत, “तुम्हाला अर्ज मागे घ्या; म्हणून सांगूनही तुम्ही अर्ज मागे घेतला नाही,’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील केराप्पा गरंडे यांनी उमेदवाराच्या दिरावर चाकूहल्ला केला. काहींनी गजाच्या साह्याने मारहाण केली.
दरम्यान, हे भांडण सोडवण्यासाठी लोक आल्यानंतर सर्वजण पळून गेले. “आता तुम्ही वाचला; पण नंतर बघून घेऊ’ अशी धमकी दिली. या मारहाणीत उमेदवाराचे पती व दीर बेशुद्ध पडले आहेत. नातेवाइकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी मंगळवेढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले.
दुसऱ्या घटनेत तुम्ही एक नंबर वॉर्डात असताना दोन नंबर वॉर्डात प्रचारासाठी का येता? या विषयावरून सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या केराप्पा गरंडे यांना सात जणांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मतदानानंतर घराकडे जाताना ज्ञानेश्वर सुखदेव गरंडे व बंडू म्हाकू गरंडे यास ज्ञानेश्वर सुखदेव गरंडे, भारत सुखदेव गरंडे, सीताराम सुखदेव गरंडे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. “तुम्ही एक नंबर वॉर्डात असताना दोन नंबर वॉर्डात प्रचार का करता? असे ते म्हणत होते. फिर्यादी व नामदेव ज्ञानोबा गरंडे हे भांडण सोडण्याकरिता गेले असता ज्ञानेश्वर सुखदेव गरंडे यांनी फिर्यादीच्या नाकावर दगडाने मारून जखमी केले. सीताराम सुखदेव गरंडे, बापू रामा गरंडे, अंकुश रामा गरंडे, संजय म्हाकू गरंडे, लक्ष्मण नरोटे या सर्वांनी फिर्यादीस व नामदेव गरंडे यास शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.