सोलापूर : ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली आहे. शुक्रवारी झालेल्या मतदानाची उद्या सोमवारी मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत व विनाअडथळा, भयमुक्त वातावरणात पार पडावी, या हेतूने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 18 जानेवारी सकाळी आठ ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तत्पूर्वी, पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या पत्रानुसार असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील अक्कलकोट, मोहोळ, बार्शी, माढा, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरस या तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार हे मिरवणूक, रॅली काढतात. गावात विनापरवाना बॅनर, फ्लेक्स लावतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यावेळी पराभूत व विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नऊ तालुक्यांत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचाही इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
* असे आहेत सक्त आदेश
– अक्कलकोट, मोहोळ, बार्शी, माढा, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरसमध्ये होणार मतमोजणी
– मतमोजणी परिसरात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय अन्य व्यक्तींसाठी मोबाइल बंदी
– तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, ज्वालाग्रही पदार्थ तथा घाऊक पदार्थ नेण्यावर निर्बंध
– मतमोजणी केंद्र परिसरात अधिकारी व कर्मचारी, उमेदवार व त्यांचे दोन पासधारक प्रतिनिधींनाच असेल परवानगी
– ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर रॅली काढणे, गुलाल उधळणे, घोषणा देणे, फटाके वाजविणे, विनापरवाना बॅनर, फ्लेक्स लावण्यावरही बंदी
– ग्रामीण हद्दीतील हॉटेल, धाबे, पान टपऱ्या 18 जानेवारीच्या रात्री दहा वाजल्यापासून 19 जानेवारीच्या सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार