मोहोळ : मोहोळ मार्केट यार्डात जनावरांच्या बाजारात दोन शेळ्या खरेदी करून २६ हजार ५०० रुपयांच्या बनावट चलनी नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात दोन तरुणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमंत सुखदेव गुंड (रा. खंडोबाची वाडी ता. मोहोळ) हे मोहोळ येथील आठवडा बाजारात स्वतःच्या मालकीच्या दोन शेळ्या विक्रीसाठी घेऊन आले होते. सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान बाजारात गुंड यांच्या जवळ अज्ञात दोन इसम आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांनी शेळ्यांची किंमत विचारली, त्यानुसार गुंड व अज्ञात दोघांमध्ये २६ हजार ५०० रुपयांचा व्यवहार ठरला होता. त्यावेळी त्या दोन अज्ञात व्यापाऱ्यांनी आमचे वाहन मार्केट यार्ड समोर थांबले आहे, तुम्ही आमच्या बरोबर शेळ्या घेऊन रोडच्या कडेला चला तुम्हाला तुमचे पैसे तिथेच देतो ,असे सांगितले.
गुंड शेळ्या घेऊन तिथे गेले, त्या अज्ञात दोन व्यापाऱ्यांनी २६ हजार ५०० रुपये मोजून दिले व हे पैसे तुमच्या खिशात ठेवा, चोरांचा खूप सुळसुळाट चालू असल्याचे सांगून शेळ्या घेऊन निघून गेले.
त्यानंतर थोड्या वेळाने गुंड यांनी पैसे बाहेर काढून पाहिले असता दोन हजार व शंभर रुपयांच्या नोटा बनावट दिसून आल्या. आसपास ठिकाणी थांबलेल्या लोकांना त्यांनी विचारणा केली असता लोकांनी सदरच्या नोटा बनावट असल्याचे सांगितले. त्यानुसार हनुमंत गुंड यांनी दोन अज्ञात इसमानी बनावट चलनी नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात २ इसमाविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात हणमंत गुंड यांनी फिर्याद दाखल केली. तपास एएसआय माने करीत आहेत.