पुणे : सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीत कोरोना लसीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. लसी सुरक्षित आहेत. मात्र या आगीमुळे एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी सीरमच्या आग लागलेल्या नव्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी मीडियाने आदर पुनावाला यांनाही काही प्रश्न विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. सीरमला लागलेल्या कालच्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे. इमारतीतील साहित्य जळून खाक झालं आहे. बीसीजी लस आणि रोटाव्हायरसचंही मोठं नुकसान झालं आहे, असं आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं.
तसेच कोव्हिशिल्ड लस दुसऱ्या ठिकाणी होती. त्यामुळे या लस सुरक्षित आहेत. तसेच या लसीच्या उत्पादनावरही कोणताही परिणाम झालेला नाही. ज्या ठिकाणी आग लागली तिथे कोणत्याही व्हॅक्सिनची निर्मिती होत नव्हती. केवळ भविष्यात या ठिकाणी लस ठेवण्यासाठी या इमारतीचं काम सुरू होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या आगीत काल पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. या कामगारांना आर्थिक मदत करण्याची माझ्या वडिलांनी घोषणा केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. तर, गरज पडल्यास राज्य सरकारही या मृत कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीसंदर्भात या संकुलास भेट दिली व पत्रकार परिषद घेतली.
* पाचजणांचा होरपळून मृत्यू
पुण्यात मांजरी येथे कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला काल गुरुवारी भीषण आग लागली होती.
या आगीत इमारतीचा चौथा मजला संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृ्त्यू झाला होता. राम शंकर हरिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतीक पाष्टे अशी मृतांची नावं असून, सर्वजण कंत्राटी कामगार होते.