नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांची केंद्र सरकारसोबतची अकरावी बैठकही निष्फळ ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायदे तात्पुरते निलंबित करत समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरची ही दुसरी बैठक होती. मात्र, ती देखील निष्फळ ठरली आहे. याचवेळी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्यात येणार होत्या, याबाबतचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. काल शुक्रवारी रात्री आंदोलनात घुसलेल्या एका शुटरला पकडण्यात आले आहे.
या कथित शुटरला चेहरा झाकून प्रसारमाध्यमांसमोर आणण्यात आले. सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी या शुटरला पकडले आहे. हा शुटर शेतकरी नेत्यांना मारण्यासाठी आला होता. त्याने मीडियासमोरच दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकरी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. मात्र, या ट्रॅक्टर मार्चमध्ये घातपात करण्याचा कट होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आलीय. शेतकऱ्यांनी संबंधित आरोपीला पकडून पत्रकार परिषदेतच बोलतं केलंय. आरोपीनेही या षडयंत्राची धक्कादायक कबुली दिलीय.
दिल्लीच्या सिंधु बॉर्डरवर शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी एका संशयिताला पकडलंय. संबंधित आरोपी आंदोलनातील 4 प्रमुख शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप होत आहे. तसेच आगामी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये देखील अडथळे निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याचं समोर आलंय. शेतकऱ्यांनी आरोपीला आपल्या राबलेल्या हाताचा चमत्कार दाखवताच त्याने थेट पत्रकार परिषदेत आपल्या कटाची कबुली दिलीय.
* आरोपीने केली धक्कादायक कबुली
आरोपी म्हणाला, “आम्हाला दोन ठिकाणी हत्यारं देण्यात आलीत. 26 जानेवारीला जसे शेतकरी ट्रॅक्टर रॅलीमधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील तसे त्यांच्यावर गोळीबार करण्यात येणार होता. आधी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाणार होता. जर शेतकरी थांबले नाही तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश आहेत. पहिल्यांदा गुढग्यांवर गोळी झाडण्यात येणार होत्या. त्यानंतर 10 जणांची आमची एक टोळी आहे ती मागच्या बाजूने गोळीबार करणार होते. त्यामुळे पोलिसांनाच वाटावं की शेतकऱ्यांनीच हा गोळीबार केलाय.”
“26 जानेवारीच्या मार्चमध्ये पोलिसांच्या वेशात आमचे निम्मे लोक राहणार आहेत. ते शेतकऱ्यांना पळवून लावण्यासाठी आहेत. 24 जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या स्टेजवर उपस्थित असणाऱ्या 4 प्रमुख नेत्यांची हत्या करण्याचेही आदेश देण्यात आलेत. त्या चौघांचे फोटोही देण्यात आलेत. आम्हाला परदिप सिंग याच्याकडून आदेश येतात. तो एका पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी आहे. तो जेव्हा जेव्हा आम्हाला भेटायला यायचा तेव्हा तोंड झाकून यायचा, पण आम्ही त्याच्या शर्टवरील बॅच पाहिला होता,” असंही या आरोपीने म्हटलंय.
* 11 व्या बैठकीतही तोडगा नाही
बैठकीत सरकारकडून शेतकरी संघटनांच्या नेत्यांना सर्व संभाव्य पर्यायांची माहिती देण्यात आली. शेतकरी संघटनांनी कायद्यांना स्थगिती देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करायला हवी, असं सरकारकडून सांगण्यात आलं. आम्ही शेतकऱ्यांना सर्व प्रस्ताव दिले आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे त्यापेक्षा चांगले पर्याय असल्यास ते सरकारकडे येऊ शकतात, असं सरकारचं म्हणणं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. आतापर्यंत 11 बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता सरकार कठोर भूमिका घेताना दिसत आहे. ‘दोन वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देऊ, असा प्रस्ताव आम्ही दिला. हा आमच्याकडून दिला गेलेला सर्वोत्तम आणि अंतिम प्रस्ताव होता. यापुढे आमच्याकडून कोणताही प्रस्ताव दिला जाणार नाही’, अशी भूमिका सरकारनं घेतली आहे.