परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या बड्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचा दावा केला जातोय. नवाब मलिक यांना शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी विचारलं असता त्यांनी शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केलाय. लवकरच या इच्छुकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत अनेकांची घरवापसी होणार असल्याचं दिसतंय.
भाजपमध्ये गेलेले 100 टक्के लोक वापस येण्यास इच्छुक आहेत, मात्र त्या सर्वांचाच प्रवेश करून घेण्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तयार नाहीत. मात्र शिवेंद्रराजेंसह काही निवडक लोकांचा प्रवेश सोहळा लवकरच होणार असल्याचे मलिक यांनी जाहीर केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी एकाच महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तीनदा भेट घेतली होती. काल अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर असताना शिवेंद्रराजे भोसले आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड खलबत झाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता या चर्चेला राष्ट्रवादीकडून दुजोरा मिळाला आहे.
शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक विद्यमान व माजी आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा काही दिवसातच आयोजित केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणीत आलेले पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबतची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला दुजोरा देत नवाब मलिक यांनी शिवेंद्रराजेंसह अनेक माजी आणि विद्यमान आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे सांगितले.