मुंबई : राज्यपालांकडे नट्यांना भेटण्यासाठी वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही का, असा संतप्त सवाल शरद पवारांनी आज आझाद मैदानावर विचारला. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कान शरद पवारांनी चांगलेच उपटले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच पवारांनी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेही कान उपटले आहेत. “महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल आम्ही पाहिला नाही. त्यांना अभिनेत्री कंगना रनौतला भेटायला वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही,” असं म्हणत टीका केली
शरद पवार म्हणाले, “शेतकरी कामगार मोर्चाच्या आयोजकांनी मला सांगितलं की सभेनंतर शेतकऱ्यांच्यावतीने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक निवेदन देण्यात येणार आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हाला असे राज्यपाल भेटले नाही. मुंबईत लाखोंच्या संख्येने येणार आहेत, राज्यपालांना भेटून फक्त निवेदन देणार आहेत. असं असताना राज्यपाल गोव्याला गेले. त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही. त्यामुळे आता हे निवेदन कुठं द्यायचं काय करायचं याचा विचार करावा लागेल.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकरी आंदोलनात केवळ पंजाब, हरियाणाचे शेतकरी असल्याचं सांगण्यात येतं. पंजाबचा शेतकरी हा काय पाकिस्तानचा आहे का? पंजाबचा शेतकरी म्हणजे काय साधा आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. पंजाब, हरियाणाचा शेतकरी गेल्या 60 दिवसांपासून आंदोलन करत आहे. पण सरकार नाकर्तेपणाची भूमिका घेत आहे. त्याचा निषेध करतोय, असं पवार यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सोमवारी दुपारी आझाद मैदानात आले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शेतकरी नेते अजित नवले, शेकाप नेते जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सपा नेते अबू आजमी, अशोक ढवळे, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड उपस्थित होते. यावेळी पवारांच्या हस्ते शेतकरी आंदोलकांसाठी अन्न पुरवठा करणाऱ्या शीख बांधवांचा सत्कार केला.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांवर टीका केली. गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक सुरू आहे. जनतेतही उद्रेक आहे. येणाऱ्या काळात हा उद्रेक अधिक वाढेल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
आम्हीही शेतकरी कायद्याविरोधात राज्यपातळीवर आंदोलन करणार आहोत. तसेच राज्याचा कायदा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे. आज शेतकऱ्यांविरोधात कायदा आणला, उद्या हे सरकार संविधानालाही हात घालेल, असा आरोपही त्यांनी केला.