वेळापूर : विविध औषधी गुणांनी युक्त असलेले डाळिंब हे भौगोलिक वातावरणात एका विशिष्ट पध्दतीने बनविले गेल्यामुळे तसेच त्याला विशेष दर्जा व गुण प्राप्त झाल्यामुळे बोंडले (ता.माळशिरस) येथील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच मधुकर तुकाराम जाधव यांच्या डाळिंबाला भारत सरकारच्या जीओग्राफिकल इंडिगेशन (जी.आय.) मानांकनाची मोहर लागली आहे. यामुळे आता जी.आय. टॅगचे हे डाळिंब जगाच्या बाजारपेठेत आपला तोरा मिरवणार आहे.
कोरडवाहू जिल्हा म्हणून ख्याती असलेल्या सोलापूर जिल्ह्याने आता फळबागांचा जिल्हा म्हणून अलीकडे नाव कमावले आहे. त्यातल्यात्यात डाळिंबांमध्ये विशेष प्रगती केली आहे.जिल्ह्यातील कोरडं हवामान हे फळांच्या चवीसाठी अत्यंत पोषक असून,कमी पाण्यात येथील शेतकरी फळबागांची लागवड करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हेच ओळखून बोंडले येथील प्रगतशील शेतकरी मधुकर तुकाराम जाधव यांनी आपले पाच एकर डाळिंब नैसर्गिकरित्या पिकवून सरकारचे जीओग्राफिकल इंडिगेशन (जी.आय.) मानांकन प्राप्त केले आहे. फळाचा आकर्षक आकार, तजेलपणा, रंग व कसलाही डाग नसलेले हे जी.आय.मानांकनामुळे आता डाळिंब सातासमुद्रापार युरोपियन राष्ट्रात विक्रीकरीता जाणार आहे.
डाळिंब बागायतदार मधुकर जाधव यांना भारत सरकारच्यावतीने जीओग्राफिकल इंडिगेशन रजिस्ट्री मार्फत देण्यात येणारे जी.आय.मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र वेळापूर येथे संपन्न झालेल्या ‘सोलापूर डाळिंब’ या भौगोलिक चिन्हांकन आणि मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रसार व प्रसिद्धीसाठी प्रशिक्षण व अधिकृत वापरकर्ता नोंदणी अभियानात देण्यात आले.
यावेळी कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक प्रशांत सुर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र माने,उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, फलोत्पादन व औषधी मंडळाचे राज्यस्तरीय सल्लागार गोविंद हांडे, कृषी पणन मंडळ,पुणेचे व्यवस्थापक सतिश वराडे, कृषी सहाय्यक मुग्धा भातलवंडे व परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
“जी.आय.मानांकनामुळे डाळिंबाचे मार्केटिंग करणे सोपे जाणार आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष महत्त्व असणार आहे. तसेच गुणवत्तेमुळे ग्राहकांची मागणी वाढणार आहे परिणामी डाळिंबाला जादा दर मिळेल”
– मधुकर तुकाराम जाधव, (डाळिंब उत्पादक शेतकरी व माजी सरपंच, बोंडले)
संकलन – महादेव जाधव, पत्रकार, वेळापूर