नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारात एका शेतक-याचा मृत्यू झाला आहे. नवनीत सिंह असे या मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. तो 30 वर्षाचा असून उत्तराखंडचा रहिवासी होता. दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सुरक्षादलाचे 83 जवान जखमी झालेत. याशिवाय 41 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसाचारात जिल्ह्यांनुसार खटले दाखल करण्यात येईल. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी संपत्तीचं नुकसान आणि कोरोना गाईडलाईन्सचे उल्लंघन करणे या कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात येणार आहे. एका पोलिसाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर हरियाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ही बैठक जवळजवळ दोन तास चालली. या बैठकीत गृह मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करत म्हटलं की, ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करत म्हटलं की, ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही हिंसा करणाऱ्यांपासून स्वतःला वेगळे करतो. आम्ही हिंसाचाराचा निषेध करतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकरी ठरलेल्या मार्गावर न गेल्याने मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. बरेच शेतकरी लाल किल्ला परिसरातही शिरले आणि तिथे आपला झेंडा फडवला. मात्र पोलिसांनी लगेचच आंदोलकांना लाल किल्ला परिसरातून हटवलं.
* सीआरपीएफच्या 15 तुकड्या तैनात
दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. परिस्थिती लक्षात घेता सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलिस दल) 15 तुकड्या दिल्ली आणि सीमावर्ती भागात तैनात केल्या जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी दिल्लीतील परिस्थितीसंदर्भात सुरू असलेली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अनेक संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यास सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांनी अजूनही हिंसाचाराची शक्यता वर्तवली आहे.
हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्रालयाकडून दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाजीपूर बॉर्डर, मुकरबा चौक आणि नांगलोआ परिसरातील इंटरनेट सेवा रात्री 12 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लाल किल्ल्या जवळची परिस्थिती अजूनही पूर्णपणे निवळलेले नसल्याने मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश (एन्ट्री) आणि बाहेर येण्याचे दरवाजे बंद केले आहे. दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, ITO मेट्रो स्टेशन, ग्रे लाइन येथील सगळे मेट्रो स्टेशन, जामा मस्जिद मेट्रो, दिलशाद गार्डन, झिलमिल और मानसरोवर पार्क मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहे. काही आंदोलक आपापल्या सीमांवर परतत आहेत. पण लाल किल्ल्यावर आंदोलकांचा जमाव अजूनही कायम आहे.
* सरकारने आंदोलन गांभीर्याने घेतले नाही – शरद पवार
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत होते. पण, सरकारने त्यांना गांभीर्याने घेतले नाही. परिणामी संयम संपल्याने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती. पण, ते अपयशी ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
* आम आदमी पार्टीने हिंसेची केली निंदा
दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीने सुद्धा येथे झालेल्या हिंसेची निंदा केली असून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने हिंसाचार होईपर्यंत परिस्थिती बिघडवली असल्याचे ही आम आदमी पक्षाकडून बोलले गेले आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे नेते शिवकुमार कक्का यांनी असे म्हटले की, दिल्लीत तोडफोड करण्यात आली आहे. तर संयुक्त किसान मोर्चाने सु्द्धा असे म्हटले की, काही असमाजिक तत्वांनी आंदोलनाला हिंसक वळण लावले. काही संघटना आणि काही लोकांनी आज नियमांचे उल्लंघन केले आहे. ही अत्यंत निंदनीय घटना आहे.