सोलापूर : बिबट्यासदृश प्राण्याने केलेल्या हल्ल्यात वाळूज (ता. मोहोळ) येथील दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे मोहोळ तालुक्यातील वाळूज, देगाव, मनगोळी, भैरववाडीसह नरखेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अनिकेत अमोल खरात (वय 10) असे त्या मुलाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसांत झाली आहे. अनिकेतच्या डोक्याच्या मागील बाजूस दोन सुळे घुसल्यासारख्या मोठ्या खुणा असून, डोक्यावर नखांनी फाडल्यासारख्या तीन- चार खुणा आहेत. मात्र हल्ला कोणत्या प्राण्याने केला हे अद्याप समजू शकले नाही. मयत अनिकेत हा आई, वडिलांना एकूलता एक मुलगा होता, त्याचे वडिल गुळवंची येथील माध्यमिक विद्यालयात सेवक पदावर कार्यरत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व मृत मुलाचे चुलते अविनाश भागवत खरात यांनी दिलेल्या माहितीवरून, मंगळवारी (ता. 26) सायंकाळी 4.30 वाजण्यादरम्यान अर्जुन, आशीष व अनिकेत अमोल खरात असे तिघेजण खरात वस्तीवरील घराच्या पाठीमागे खेळत होते. त्या वेळी त्यांचे नातेवाईक बाजूच्या कांद्याच्या शेतामध्ये काम करीत होते.
त्या वेळी मुले घराच्या मागील पटांगणात खेळत होती. साधारण सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मुले मोठमोठ्याने ओरडू लागली व त्या वेळी कुत्रीसुद्धा मोठमोठ्याने भुंकू लागली म्हणून नातेवाईक तिकडे पळत गेले असता, मुलांनी सांगितले की, अनिकेतला मोठ्या तोंडाच्या व त्याच्या अंगावर ठिपके असलेल्या प्राण्याने मक्याच्या शेतामध्ये हल्ला करून ओढून नेले आहे.
तेव्हा जवळच असलेल्या मक्याच्या शेतात जाऊन पाहिले असता कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तो प्राणी पळून गेला होता व अनिकेत हा जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मक्याचे शेतामध्ये पडला होता. त्या वेळी अनिकेतचे चुलते व भाऊ अजित याने पाहिले असता अनिकेतच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस मोठ्या फाटल्याच्या जखमा होऊन त्यातून रक्तस्राव झाला होता. अनिकेतला औषध उपचारासाठी सरकारी दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यास तपासून तो मृत झाल्याचे सांगितले. या घटनेचा पुढील तपास नरखेड पोलिस ठाण्याचे अंमलदार गणेश पोफळे करीत आहेत.