सोलापूर : भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसचा हात हाती धरत आहेत. धवलसिंह मोहिते पाटील उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत.
सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. स्वत: डॉ धवलसिंह यांनी याला दुजोरा दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनमध्ये उद्या (गुरुवारी) दुपारी तीन वाजता पक्षप्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यात युवा चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने जाणते कार्यकर्तेही पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, अशी आशाही काँग्रेसच्या नेत्यांना आहे. मोहिते पाटील यांच्या घराण्यातील नेत्याला पक्षात घेऊन काँग्रेस भाजपला राजकीय शह देण्याच्या प्रयत्नात आहे.
शिवसेनेत असणारे धवलसिंह यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले होते. पण राष्ट्रवादीत दुर्लक्षित राहिल्याने उद्या ( ता. 28) संध्याकाळी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापुरातील स्ट्राँग आणि तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. शिवाय मागील महिन्यात नरभक्षक बिबट्याला मारल्यामुळे त्यांच्या इमेज बिल्डिंगमध्येही मदत झाली होती.
* दुसऱ्या पिढीतही अखंडपणे सुरु
मोहिते विरुद्ध मोहिते ही लढाई त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पिढीतही अखंडपणे सुरु ठेवली होती. विजयसिंह मोहिते पाटील गटाला विरोध करण्याचं काम ते करत होते. सुरुवातीला काही काळ ते शिवसेनेत होते. परंतु शिवसेनेत अपेक्षित जबाबदारी न मिळाल्याने त्यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. अतिशय कमी मतांच्या फरकाने भाजपच्या राम सातपुते यांचा विजय झाला होता. परंतु राष्ट्रवादीतही दुर्लक्षित झाल्याने त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.