मुंबई : भेंडीबाजार म्हटले की सिल्व्हर ओकला त्रास होतो आणि बेहरामपाडा म्हटले की मातोश्रीला त्रास होतो, अशा शब्दांत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशीष शेलार यांनी निशाणा साधला आहे. ‘सिल्व्हर ओक’ हे शरद पवार यांचे मंबईतील निवासस्थान असून ‘मातोश्री’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे.
शेतकरी आंदोलनावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असून भारतीय जनता पक्षाचे नेते आशीष शेलार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ‘लेखाजोखा’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी भाजपचे आमदार आशीष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनात भेंडीबाजारातील महिला कशा असा सवाल करत आंदोलनाला संबोधित करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर प्रविण दरेकर यांनी निशाणा साधला होता. त्यावर दरेकर यांच्या वक्तव्याची आपल्याला लाज वाटते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. याचा उल्लेख दरेकर यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरेकर आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्राचे जाणते नेते असे म्हटले की मला वाईट वाटते म्हणे… मीही आधी विरोधी पक्षनेता होतो म्हणे… मी शरद पवार यांना पत्रं पाठवलं. आता लेखाजोखा पाठवतोय. आता ते तरी बघून माझी लाज वाटणार नाही. हे पाहून तरी त्यांनी असंच खुल्या दिलाने कौतुक करावे. शरद पवार यांना फक्त भेंडीबाजार झोंबले.
दरेकर यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून आशीष शेलार यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शेलार आपल्या भाषणात म्हणाले, ‘जनतेसाठी काम करणाराच जनतेसमोर त्या कामांची मांडणी अगदी ठासून करू शकतो. प्रविण दरेकरांनी आता अधिक वेळ विरोधी पक्षनेते राहू नये इतकीच इच्छा.
* देवेंद्र फडणवीस राजकारणातील कृष्ण
देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कृष्ण आहेत. आता सुदर्शन चक्र काढावेच लागेल. ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातून काढा असे म्हणत पुढे शेलारांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, भेंडीबाजार म्हटले की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटले की मातोश्रीला त्रास होतो. ‘दरेकरांनी काढला लेखाजोखा, पण त्यांचे आपले अजूनही तेच माझ्या लेकाला जपा’, अशा शब्दांत शेलार यांनी ठाकरे कुटुंबावरही जोरदार निशाणा साधला.