मुंबई / सोलापूर : सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते – पाटील यांनी आज मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील काँग्रेस भवनामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. शिवसेना ते राष्ट्रवादी प्रवास केलेले डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षात घेऊन काँग्रेसने याची सुरूवात केली. आज धवलसिंह मोहिते पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी ‘एकच वादा धवल दादा’ अशा घोषणा देऊन समर्थकांनी सभागृह दणाणून सोडला होता. धवलसिंह यांच्या हजारो समर्थकांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस संपवण्याचे प्रयत्न केले पण काँग्रेस संपली नाही. धवलसिंह मोहिते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवला. धवलसिंह यांच्या येण्याने सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळेल. धवलसिंह यांनी बिबट्याला टिपले आता भाजपला ही टिपतील’, असा विश्वास धीरज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, मी कृषिमंत्री असताना पहिल्यांदा धवलसिंह मोहिते पाटील यांना भेटलो. त्यांनी बिबट्या मारला हे आज कळलं. जर कोणी चुकीचं वागलं त्याचा कार्यक्रम ते करतात. त्यांच्याकडं धाडस आणि विनम्रता आहे. साखर कारखाने संस्था हे काँग्रेस विचाराने झालं. मध्ये काही गोष्टी झाल्या इकडे तिकडे गेले पण पुन्हा स्वगृही आले आहेत, असं ते म्हणाले. थोरात म्हणाले की, काँग्रेस संपली असं म्हटलं जात असताना ती उभी राहिली आहे. काँग्रेसचा विचार राज्यघटनेचं मूलभूत तत्वाशी आहे. हीच घटना देशाला पुढे नेणार. तो श्वाश्वत विचार आहे. पुन्हा काँग्रेस नेतृत्व उभं राहिलेलं दिसलं. नवीन फळी निर्माण करणं महत्वाचं आहे. जो लौकिक आदर मिळाला तो देशात राज्यात मिळाला तो पक्षाने दिला. तुम्ही काम करत राहा पुढे आमदारकी की खासदारकी संधी पक्ष देईल, असं थोरात म्हणाले. पहिले टार्गेट जिल्हा परिषद अध्यक्ष काँग्रेसचा झाला पाहिजे, असंही ते म्हणाले.
“मोहिते पाटील आणि काँग्रेस हे जुने नाते आहे. माझे वडिलांनी राजकारणाची सुरुवात ही काँग्रेस पक्षाकडून केली होती. सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली गेली आहे. राजकारणात चांगले आणि वाईट दिवस बघायला मिळाले. पण काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा असून काम करण्याची नव्याने मला संधी मिळाली आहे”
– धवलसिंह मोहिते – पाटील