मुंबई : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या फोटोखाली भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच हस्तक्षेप केला आहे. या संपूर्ण प्रकाराने आपल्याला धक्का बसला आहे, भाजपने या प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करावी, नाहीतर सायबर सेल पुढील कारवाई करेल, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर ही चुक लक्षात आल्यावर हा चुकीचा उल्लेख काढून टाकण्यात आला, ती चुक सुधारण्यात आली. प्रत्यक्षात हा गुगलच्या भाषांतराचा गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रक्षा खडसे या रावेर मतदार संघातून भाजपच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपच्या बेवसाईटवर त्यांची ओळख वाईट शब्दात करण्यात आल्याचे स्क्रीनशॉट समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधितावर कारवाईचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपाने संबंधित दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर पुढील कारवाई करेल’, असा इशारा अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिला आहे.
माहितीनुसार रावेरचं हिंदीमधील गुगल ट्रान्सलेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.