मुंबई : सिनेमांपेक्षा सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एक वादग्रस्त ट्वीट आणि फेसबुक पोस्ट केलं आहे. कंगनाने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच ३० जानेवारी रोजी त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या संदर्भात एक ट्वीट केलं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.
कंगनाने नथुराम गोडसे याचे फोटो ट्वीट आणि फेसबुक पोस्ट करत लिहिलं की, ‘प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. एक तुमची.. एक माझी आणि एक खरी. चांगली कथा सांगणारा कधीही बांधिल नसतो आणि तो काही लपवतही नाही. म्हणूनच आपली पुस्तकं निरुपयोगी आहेत. त्यात फक्त दिखावाच आहे.
या फेसबुक पोस्ट आणि ट्वीटमध्ये कंगनाने एका प्रकारे महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचं नथूराम गोडसे याचं समर्थन केलं आहे. यानंतर सोशल मीडिया यूजर्स तिच्यावर टीका करत आहेत आणि पुण्यतिथीला हे ट्वीट टाकल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत तर विशेष म्हणजे काहींनी स्वागत केलंय. यामुळे आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलताना कंगना आता आगामी ‘थलावी’ चित्रपटात दिसणार आहे ज्यात ती जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय ‘धाकड’ चित्रपटामध्ये ती एक सिक्रेट सर्व्हिस एजंट आणि ‘तेजस’ चित्रपटामध्ये ती भारतीय वायुसेनेची पायलट म्हणून दिसणार आहे. या व्यतिरिक्त कंगनाने अलीकडेच आणखी एक चित्रपट साईन केला असून त्यामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.