कोल्हापूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने ही कारवाई करण्यात आली. या बँकेतील 24 कोटी 40 लाखांच्या अपहारप्रकरणी काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात अध्यक्षांसह 37 जण आरोपी होते. दरम्यान या बँकेत पैसे जमा करणाऱ्या 99 टक्क्यांहून अधिक खातेदारांना त्यांची रक्कम परत मिळणार आहे.
इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केलीय. यापूर्वीसुद्धा रिझर्व्ह बँकेनं शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. काही दिवसांपूर्वीच बँकेतील 24 कोटी 40 लाखांचा अपहारप्रकरणी अध्यक्षांसह 37 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परवाना रद्द झाल्याने जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आलेय.
शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच भविष्यात भांडवल उत्पन्न करण्याचं कोणतंही साधन नाही. त्यामुळेच बँकेचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला आहे. 29 जानेवारी 2021पासून आर्थिक व्यवहार किंवा कोणतेही बँकिंग व्यवहार बँकेला करता येणार नाहीत. आरबीआयनं शिवम सहकारी बँकेचे नुकसानाचे आकडेसुद्धा दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पैसे जमा करणाऱ्या 99 टक्क्यांहून अधिक खातेदारांची रक्कम इश्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे आहे. बँक बंद झाली असली तरी लिक्विडेशननंतर बँकेत पैसे जमा असलेल्या खातेदारांना डिपॉझिट इन्श्युरन्स क्लेम मिळणार आहे. ज्यांनी बँकेत 5 लाख रुपये जमा केलेले आहेत, त्यांचा याचा लाभ मिळणार आहे.
सध्या बँक आपल्या खातेदारांना त्यांची सर्व रक्कम परत करण्यास असमर्थ आहे. बँकेला व्यवसाय करण्याची परवानगी दिल्यास लोकांना आणखी नुकसान सहन करावं लागू शकतं. शिवम सहकारी बँकेचं लिक्विडेशन सुरू झाल्यानंतर खातेदारांचे पैसे परत केले जाणार आहेत.
आरबीआयनं महाराष्ट्रातील रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीला निर्देश दिले आहेत की, बँकेला बँद करण्याचे निर्देश जारी करावेत. बँकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यानं बँक चालून ठेवणं म्हणजे पैसे जमा करणाऱ्या खातेदारांवर अन्याय होईल.