सोलापूर : सोलापूरचा मानाचा असलेला सोन्नलगी पुरस्कार दैनिक सुराज्य आणि सुराज्य डिजिटल वेबपोर्टलचे संपादक राकेश टोळ्ये यांच्यासह इतर मान्यवरांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अंगावर बाराबंदी पोषाख, शाल श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
हिप्परगा येथील शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्क येथे आज हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी होते तर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे, माजी खासदार धर्मण्णा सादूल, सुप्रिता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिवशंकर चाकोते यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली. सोन्नलगी हे सोलापूरचे मूळ नाव विस्मरणात जावू नये म्हणूनच सोन्नलगी अॅक्वा पार्कच्या माध्यमातून शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्कची निर्मिती केल्याचे सांगितले.
यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले,
प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात व्यवसायात प्रामाणिकपणे कार्य करीत असतोच परंतु काहीजण आपल्या कामातून वेगळा ठसा निर्माण करतात त्यातून समाजाला नवी दिशा मिळते अशांचा सन्मान करणे योग्यच आहे आणि सोलापूरमधील अशीच काही कर्तव्यतत्पर अधिकारी, पत्रकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांना निवडून त्यांच्या कामाला प्रतिष्ठा देण्याच्या दृष्टीने चाकोते परिवाराने सोन्नलगी पुरस्कार देवून गौरव केला आहे. ही परंपरा चांगली आहे आणि त्याची जोपासना माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केली त्याचा आनंद असल्याचे म्हटले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूरचे मूळ नाव सोन्नलगी होते ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराज यांनी या नगराचे सोन्नलगी असे नामकरण केले होते. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा पगडा असलेल्या सोन्नलगीचे सोलापूरमध्ये रुपांतर झाले आहे. या हुतात्म्यांच्या नगरीत अनेक कर्तबगार जन्मले. सोलापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा मान सन्मान सोलापूरकर अत्यंत मनमोकळेपणाने करतात म्हणूनच प्रशासकीय सेवेत असलेल्यांचाही त्यांच्या कार्याची दखल घेवून सोन्नलगी पुरस्काराने सन्मान करण्यात आला असल्याचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.
* यांचा झाला सन्मान
सोन्नलगी रत्न या पुरस्काराने नगरसेवक बाबा मिस्त्री यांना जाहीर झाला परंतु ते दिल्ली येथे गेल्याने त्यांचा मुलगा तौसिफ बाबा मिस्त्री यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सोन्नलगी भूषण पुरस्कार सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना जाहीर झाला परंतु ते परगावी असल्याने त्यांचा पुरस्कार सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी स्विकारला. तसेच सोन्नलगी गौरव पुरस्काराने दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळ्ळे यांना प्रदान करण्यात आला. तर उद्योजक इंदरमल जैन यांना सोन्नलगी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोना काळात अनेक चांगले उपक्रम राबवून पोलीस तसेच नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, विद्यमान सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपअधिक्षक सुर्यकांत पाटील यांचा सोन्नलगी सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला.