मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा रविवारी पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही या सोहळ्याला हजर राहिले. या सोहळ्यात राऊत यांनी फडणवीस यांची गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होते. हे दृश्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या वर्षभरात न दिसलेलं चित्र पाहायला मिळालं.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपूडा काल रविवारी पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. या सोहळ्यात विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* जोरदार वाकयुद्ध झाले होते
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन बेबनाव झाला. पुढे संजय राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यातून अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली आणि राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर गेल्या वर्षभरात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध पाहायला मिळालं. खुद्द संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनीही एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी केली आहे. त्यामुळे आज राऊतांच्या कन्येच्या साखरपुड्यात दिसलेलं चित्र अनेकांसाठी भुवया उंचावणारं आहे.
* समोरासमोर आल्यानंतर झाली गळाभेट
देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे एकत्रच कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावेळी मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांचं आगमन झाल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दुसरीकडे असलेल्या संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिलं आणि ते फडणवीसांकडे आले. दोघेही समोरासमोर आल्यानंतर राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. त्यानंतर नव्या जोडप्यासह नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसोबत फडणवीसांनी फोटो काढले. त्यानंतर दरेकर यांनी पुढे होत नव्या जोडप्याला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. तेव्हा राऊतांनीही पुढे होत दरेकरांच्या हातात हात दिला.