सोलापूर : पोलिओची लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात प्लास्टिकचा सूक्ष्म तुकडा गेल्याची धक्कादायक घटना सोलापुरात समोर आली आहे.यवतमाळमध्ये बारा मुलांना पोलिओऐवजी सॅनिटायजर पाजल्याने तब्येत बिघडली आहे. त्यापाठोपाठ सोलापुरातही असा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी धक्कादायक प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओऐवजी सॅनिटायजर पाजले गेले. त्यामुळे 12 मुलांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
भाळवणी (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल रविवारी पोलिओ लसीकरणादरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे लसीकरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या निमित्ताने समोर आला आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या राजेश्री ताड यांनी जिल्हा प्रशसानाकडे केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनामुळे लांबणीवर पडलेली पोलिओ लसीकरणाची मोहीम रविवारी सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात आली. जास्तीत जास्त मुलांना पोलिओ लस देण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रासह अंगणवाड्यांमध्ये लसीकरणाची सोय केली होती.
रविवारी सकाळी भाळवणी येथील माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. लस देताना वैद्यकीय केंद्रातील एक महिला लांबूनच बाळांच्या तोंडात लस टाकत होती. बुरांडे यांच्या लहान बाळाच्या तोंडात लस टाकत असताना हलगर्जीपणामुळे लसीबरोबरच ड्रॉपरचे टोपणही (प्लास्टिकचा लहान तुकडा) बाळाच्या तोंडात गेला. हा प्रकार येथील वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांच्या समोर घडला. घरी गेल्यानंतर बाळाला त्रास सुरू झाला. त्यानंतर माधुरी बुरांडे यांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्त्या राजेश्री ताड यांना सांगितली.
आज संबंधित बाळाला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या ताड यांनी दिली.
रविवारी पोलिओ लसीकरणाच्या वेळी माधुरी बुरांडे यांच्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओ लस देताना त्याच्या पोटात प्लास्टिकचा लहान तुकडा गेला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय स्कॅनिंग देखील केले आहे. रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार केले जातील. बाळाच्या आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
* विचारण्यास गेले असता घातली हुज्जत
राजेश्री ताड यांनी आधी उपचारासाठी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांना याबाबत विचारले असता त्यांनी ताड यांना सविस्तर माहिती देण्याऐवजी उलट त्यांच्याशी हुज्जतही घातली. दरम्यान, या प्रकाराला येथील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाने कारवाई करावी, अन्यथा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही राजेश्री ताड यांनी दिला आहे.