नातेपुते : नातेपुते ते वालचंद नगर रोडवर काल सोमवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन तीन युवक जागीच ठार झाले. दहिगांव (ता. माळशिरस) पंडीत बाग येथे दोन मोटारसायकलचा समोरा-समोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण आपघातात तीनजण जागीच ठार झाले. यात मागील प्लॅस्टिकच्या कँडमधील डिझेलने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला.
दीपक विठ्ठल बुधावले ( वय२४), विशाल शशिकांत बुधावले (वय २५, दोघे रा.पिरळे ता.माळशिरस) आणि संग्राम रामदास जाधव (वय २७ रा.हागारेवाडी ता.इंदापूर ) असे मयत झालेल्या तिघांची नावे आहेत. दीपक आणि विशाला हे दोघे दुचाकीवरुन
शेतात नांगरण्यासाठी ट्रॅक्टरला एका प्लॅस्टिकच्या कँडमध्ये डिझेल घेऊन दहिगांवमार्गे पिरळे गावाकडे जात होते. विशाल शशिकांत बुधावले हा मोटारसायकल चालवित होता. व दीपक विठ्ठल बुधावले हा डिझेलचे कँड घेऊन पाठीमागे गाडीवर बसला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोघे सोमवार रात्री ९:३० च्या दरम्यान नातेपुते ते दहिगांव जाणा-या रोडवरील पंडीत बाग जवळ पिरळे गावाकडे घरी जात असताना दहिगांवकडून येणा-या संग्राम रामदास जाधव (वय २७ रा.हागारेवाडी ता.इंदापूर ) हा दुचाकीवरुन दहिगांववरून येत असताना, समोरा-समोर जोराची धडक झाली.
या जोराच्या धडकेत प्लॅस्टिकच्या कँडमधील डिझेल मोटारसायकलवर पडून त्याचा भडका झाला. आग लागून त्यात ते गंभीररीत्या भाजून, डोकीस, हाता-पायास मार लागून तिघे जागीच मयत झाले. या अपघाताची माहिती नातेपुते पोलिसास समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून अपघातातील मयत झालेल्या तिघांना नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
अपघाताची नातेपुते पोलिसात नोंद करण्यात आली असून, अपघाताचा पुढील तपास फौजदार प्रकाश इंगळे करीत आहेत.