नवी दिल्ली : कोणताच प्रोपोगंडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही. आम्ही एकजुटीने प्रगतीच्या दिशेने जाऊ. कोणताच चुकीचा प्रचार भारताला प्रगतीचा दिशेला जाण्यापासून रोखू शकत नाही. हे अशाप्रकारचे प्रोपोगांडा भारताच्या भविष्याचा निर्णय घेऊ शकत नाही. भारताची प्रगतीसाठी एकजूट आहे”, असं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेला शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आता जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. हॉलिवूडची पॉप सिंगर रिहाना हिने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने तिला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
मात्र, कंगनाने आंदोलक शेतकऱ्यांना अतिरेकी म्हटलंय. कंगनाच्या ट्विटनंतर अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगन यांनीदेखील रिहानाच्या ट्विटवर टीका करत भारताची एकता आणि अखंडता नेहमी अबाधित आहे आणि राहील, असा संदेश दिला. त्यानंतर आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत या विषयावर भाष्य केलं आहे.
* अजय आणि सुनील शेट्टींनी रिहानाला झापले
अजय देवगन आणि सुनील शेट्टी यांनी ट्विट करून रिहानाला अप्रत्यक्षपणे झापलं आहे. दोघांनीही आपल्या ट्विटमध्ये एकतेवर भर दिला आहे. कोणत्याही बाहेरच्या अपप्रचाराचा आपल्यावर प्रभाव पडता कामा नये, असं सांगतानाच अर्ध सत्य नेहमीच धोकादायक असतं, असं या दोघांनी म्हटलं आहे.
दिग्दर्शक करण जोहरनेही शेतकरी मुद्द्यावरून होत असलेल्या विदेशी अपप्रचारावर टीका केली आहे. आपल्याला आपली एकी कायम ठेवली पाहिजे, असं सांगतानाच शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघेल, असं करण जोहर यांनी म्हटलं आहे. एकता कपूरनेही विदेशी अपप्रचारापासून सावध राहण्याचं आवाहन करतानाच सर्वांनी एकजूट राहण्याचं आवाहनही केलं आहे.