मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले यांनी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पटोले यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.
विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होणार असल्याचे जवळपास नक्की झाले असून ते लवकरच विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत होते. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काही फेरबदल होतील, अशीही शक्यता आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी राज्यातील नेत्यांसोबत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत चर्चा केली होती. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी अनुकूल असले तरी राज्यातील नेत्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव लावून धरले आहेत. पटोले यांचे नाव निश्चित झाल्याचे मानले जात असले तरी ते मंत्रिपदासाठी अडून बसल्याने अंतिम निर्णयाला विलंब लागला आहे. मात्र, आता हा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यास रिक्त होणारे पद शिवसेनेकडे सोपवण्याची तयारी काँग्रेसने दाखविल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम मानली जाणारी काँग्रेसची शक्ती प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे समजते.
नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्तीशी संबंधित काही मुद्द्यांमध्ये अध्यक्षपद हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने मान्य केले. विद्यमान अध्यक्षांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण, के. सी. पडवी, यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. अध्यक्षपद सोडायचे नाही, असे ठरल्यास अशोक चव्हाण किंवा नितीन राऊत यांच्याशी पटोलेंच्या जबाबदारीची आदलाबदल होऊ शकते. पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळेन पण, मंत्रिपद हवे असल्याची अट घातल्याचेही बोलले जाते. त्यामुळे हा पदबदलाचा प्रस्ताव चर्चेत आला आहे.
* विधानसभा अध्यक्ष पदासाठी कोण?
काँग्रेस पक्षाला देशासह राज्यातील नेतृत्वावरुन सध्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रात देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी खलबतं होताना दिसत आहेत. या सगळ्या चर्चेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. जर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्ष पदासाठी कोण? हा सवाल उपस्थित होत आहे. जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.