बार्शी : अज्ञात सहा दरोडेखोरांनी मध्यरात्री प्रवेश करुन प्राणघातक शस्त्राचा धाक दाखवित घरातील रोख रक्कम व दागिन्यांसह सुमारे साडेअकरा लाख रुपयांचा ऐवज पळवून नेल्याची घटना शहरातील सुभाषनगर भागात घडली आहे. या दरोड्याच्या वृत्ताने शहरात खळबळ माजली आहे.
याबाबत कालिंदा ईश्वर मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुभाषनगर भागातील गौतम मंगल कार्यालयाजवळ कालिंदा मुंडे या आपल्या दोन मुलांसह राहण्यास आहेत. त्यांची जवळच असलेल्या भूम तालुक्यातील तांबेवाडी येथे शेती आहे. त्यामुळे त्यांची मुले व सून अधूनमधून शेतामध्ये मुक्कामास जातात. नातवंडे लहान असल्यामुळे त्या घरी थांबून त्यांचा सांभाळ करतात.
काल गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्यांची मुले व सून शेताकडे गेले. त्यामुळे त्या नातवंडांसह घरी होत्या. रात्री दोनच्या सुमारास कशाचा तरी धक्का लागल्याने त्यांना जाग आली. त्यावेळी खोलीतील लाईट चालू होती. खोलीमध्ये अंदाजे 20 ते 25 वयाचे हाफ जिन्स पँट व जर्किंन घातलेले चार जण, दरवाजाजवळ एक जण व बाहेर खिडकीत एक जण असे एकूण सहा जण उभे होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खोलीमध्ये उभे असलेल्यांपैकी एकाजवळ मोठा सुरा होता. तर एकाच्या हातात लाकडी दांडके होते. त्यांना जाग आल्याचे पाहून जवळच उभा असलेल्याने हातातील सुरा दाखवून पलंगावर आहे, त्या स्थितीत त्यांना दाबून दरडावून ‘ए आज्जे माल सांग कुठाय? अशी विचारणा केली. त्यामुळे घाबरुन त्या ओरडल्या असता दुसर्याने त्यांच्या तोंडावर गोधडी दाबून धरली. त्यानंतर त्यांनी घरातील लोखंडी कपाट उचकटून त्यातील लॉकरमधील सॅक व दागिन्यांचा पितळी डबा घेवून ते पळून गेले. जाताना त्यांनी खोलीला बाहेरुन कडी लावली.
ते गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारे शुभम दुरगुडे, मिरा दुरगुडे, नवरतन जोशी, महावीर जोशी धावून आले. दरोडेखोरांनी जिन्याच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडलेले आढळून आले. त्याचप्रमाणे त्यांनी मुंढे झोपलेल्या खोलीची कडी खिडकीतून बांबूच्या मदतीने काढल्याचे दिसून आले. घरातील इतर खोलीतील कपाटे उचकटून त्यातील सामान अस्ताव्यस्त पसरलेले होते.
या दरोड्यात रोख रक्कम, सोने-चांदीच्या दागिन्यांसह घरातील कागदपत्रांचीही पिशवी पळविण्यात आली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर आणि पो.नि. संतोष गिरीगोसावी यांनी भेट देवून पहाणी केली. अलीकडच्या काळात बार्शीत पडलेला हा सर्वात मोठा दरोडा असून याबाबत पुढील तपास स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.