सोलापूर / पंढरपूर : भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी वीज बिलाविरोधातील आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिरीष कटेकर यांना काळे फासले आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला.
संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शनिवारी कटेकर यांना गाठले आणि त्यांना काळे फासले. तसेच त्यांना साडी नेसवण्याचाही प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना जाब विचारत अर्वाच्य भाषा वापरली आहे. दरम्यान, शिरीष कटेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर उद्या पंढरपूर शहर बंद करण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* या प्रकारामुळे शिवसैनिक संतप्त
वीज बिलाविरोधात काल शुक्रवारी भाजपने राज्यभरात आंदोलन केले होते. पंढरपूरमध्येही भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती.
यावेळी टीका करताना ते म्हणाले होते की, सांगली, सातारा परिसरात अतिवृष्टी झाल्यावर शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण आता मात्र त्यांनी फक्त ५ हजार रुपये दिले. सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री करु, असे म्हणणारे ठाकरे स्वत:च मुख्यमंत्रीपदी बसले. बायकोचे लुगडे धरुन घरात बसतो. बाहेर पडत नाही. का तर कोरोना होईल म्हणून’, अशा शब्दात कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. याचा निषेध शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला व काळे फासले.