मुंबई : टाटा समूहाचे रतन टाटा यांना भारतातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे, यासाठी सोशल मीडियावर ट्रेंड चालू आहे. यावर रतन टाटा यांनी ट्विट करून लोकांच्या भावनांबद्दल आभार व्यक्त केले. मात्र अशा प्रकारची मागणी करु नका, असे आवाहन त्यांनी ट्विट करून केले आहे. मी एक भारतीय म्हणून स्वतःला नशिबवान समजतो आणि भारताच्या प्रगतीसाठी माझे योगदान देण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असलेले रतन टाटा यांच्या समाजकार्याची यादी फार मोठी आहे. कोरोना संकटाच्या काळातही त्यांनी हे समाजकार्य सुरूच ठेवले. एक यशस्वी उद्योगपती बरोबरच मोठ्या मनाचा माणूस, अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच शुक्रवारी सोशल मीडियावर रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी होत होती. मोटिवेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारत रत्न देण्याची मागणी ट्विटवरून केली. त्यानंतर BharatRatnaForRatanTata हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लोकांचे प्रेम पाहून भारावलेल्या रतन टाटा यांनी आज शनिवारी ट्विट करून सर्वांचे आभार मानले. त्यांनी लिहिलं की,”मला भारत रत्न पुरस्कार मिळावा यासाठी सोशल मीडियावरून तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. पण, मी एक विनंती करू इच्छितो की ही मोहीम थांबवावी. मी स्वतःला भारतीय असल्याचे भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगती व समृद्धीसाठी मी माझे प्रयत्न व योगदान देत राहीन.”
* टाटा समूहाचा दानशूरपणा
मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे पालिकेला १०० व्हेंटिलेटर, २० रुग्णवाहिका व दहा कोटींचे अर्थसाहाय्य देण्यात आले.
रतन टाटा यांची दर्यादिली आणि दानत जगाला माहिती आहे. त्यामुळेच, रतन टाटा यांच्यावर कोट्यवधी भारतीय प्रेम करतात. त्याचप्रमाणे, टाटा हेही भारतावर आणि भारतीय नागरिकांवर प्रेम करतात. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची अगदी कुटुंबाप्रमाणे काळजी करतात. कोरोना कालावधीतही टाटा यांच्या या दानशूर स्वभावाचा देशावासीयांनी अनुभव घेतला आहे. कोरोना काळात टाटा कंपनीने लॉकडाऊनमध्येही कर्मचाऱ्यांना पगार तर दिला. आता, कंपनीतील कर्मचाऱ्यांनासाठी दिवाळी बोनसही जाहीर केला आहे.