नाशिक : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ उमेदवारांच्या नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मान्यता न दिल्यानं महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत या मुद्द्यावरून राज्यपालांना इशारा दिला आहे. ‘राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जायला लावू नये,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल कोट्यातून भरावयाच्या विधान परिषदेतील १२ जागा सध्या रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळानं त्यासाठी नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे. सर्व बाजूनं विचार करून आणि नियम-अटींचे पालन करून सरकारनं ही नावं पाठवली आहेत. मात्र, नावांची शिफारस करून दोन महिने उलटल्यानंतरही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळं महाविकास आघाडीचे नेते संतापले आहेत. राज्यपालांनी आमचा अंत पाहू नये, असा इशारा कालच अजित पवार यांनी या संदर्भात बोलताना दिला होता. त्यानंतर आज संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करताना राज्यपालांवर टीका केली आहे.
* केंद्राने राज्यपालांना परत बोलवावे
‘राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मात्र, राज्यपाल घटनाबाह्य वागत आहेत. १२ आमदारांची नियुक्ती राजकीय नाही. सरकारनं केलेल्या शिफारशी स्वीकारणं राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल त्यावर निर्णय घेत नाहीत. त्यांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये,’ असं राऊत म्हणाले. ‘केंद्रानं राज्यपालांना परत बोलवावं,’ अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.