नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) मागील वर्षी घेण्यात आलेली परीक्षा देण्याची शेवटची संधी हुकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. फक्त त्यासाठी संबंधित उमेदवाराने वयोमर्यादा ओलांडलेली नसावी, अशी अट सरकारकडून घालण्यात आली आहे.
या उमेदवारांना आणखी एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाऊ शकते असे केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थिनी रचना सिंह हिने या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनामुळे मागील वर्षी युपीएससीकडून घेण्यात आलेली पूर्वपरीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना आणखी संधी देण्यात यावी अशी मागणी तिने आपल्या याचिकेत केली होती. यूपीएससीकडून मागील वर्षी ही परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा मे महिन्यामध्ये होणार होती. पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या अनुषंगाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगालाही या उमेदवारांना वाढीव संधी देण्याबाबत तसेच वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले होते.
केंद्राचा विरोध कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने २६ ऑक्टोबरला न्यायालयास माहिती देताना ही परीक्षा देण्याची शेवटची संधी गमावलेल्यांना पुन्हा ती देण्याचा आमचा विचार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर २२ जानेवारी रोजी केंद्राने अशी संधी देण्यास विरोध दर्शविला होता. दरम्यान यंदा घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची अधिसूचना १० फेब्रुवारी रोजी निघण्याची शक्यता आहे.