मुंबई : बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी आली आहे. कपूर कुटुंबावर पुन्हा संकट कोसळले आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात भरती केलं, पण उपचार सुरू करण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं होतं.
रणधीर यांनी स्वतः राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं. भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, ‘आज मी माझा छोटा भाऊ राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या काही महिन्यांत कपूर घराण्यातील अनेकांनी या जगाला निरोप दिला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला, त्यानंतर अवघ्या काही महिन्यात कपूर कुटुंबियांना हा दुसरा धक्का सहन करावा लागत आहे.
अभिनेते आणि सदाबहार कलावंत ऋषी कपूर यांच्या निधनानं अवघ्या सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी लढत होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं . ३० एप्रिल रोजी गुरुवारी, सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६७ वर्षांचे होते.