नवी दिल्ली : पुढील वर्षी अंतराळ मोहिमेसाठी जाणाऱ्या अंतराळवीरांना त्यांच्याबरोबर बिर्याणी, खिचडी आणि लोणचं नेता येणार आहे. डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे. अंतराळवीरांसाठी बनवण्यात आलेल्या जेवणामध्ये झिरो ग्रॅव्हिटी लो फ्रेंग्मेंटेशनवर लक्ष देण्यात आलं आहे. अंतराळातील हा प्रवास 7 दिवसांचा असणार असून यावेळी त्यांना आवडीचे पदार्थ खाता येणार आहेत.
अंतराळ मोहिमेसाठी पुढील वर्षी जाणाऱ्या गगनयान स्पेशफ्लाइटमध्ये अंतराळवीरांना त्यांच्याबरोबर बिर्याणी, खिचडी आणि लोणचं नेता येणार आहे. हे जेवण 2 वर्षांच्या प्रयोगानंतर मिलिट्री लॅबमध्ये तयार करण्यात आले आहे. जेवणामध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर दोन वर्षांपर्यंत प्रयोग करून काही खास पदार्थ अंतराळात नेण्यास परवानगी मिळाली आहे.
हाती आलेल्या एका वृत्तानुसार, डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी (DFRL) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी अशी माहिती दिली आहे की अंतराळवीरांसाठी बनवण्यात आलेल्या जेवणामध्ये खास पोषक घटकांवर अधिक लक्ष देण्यात आलं आहे. झिरो ग्रॅव्हिटीमध्ये लो फ्रेंग्मेंटेशनबाबत देखील लक्ष देण्यात आलं आहे. अंतराळवीर अंतराळात तीन वेळा खाणं खाणार आहेत. प्रत्येक डाएटमध्ये जवळपास 2500 कॅलरी ऊर्जा असेल. आणखी एका वरिष्ठ शास्त्रज्ञांनी अशी माहिती दिली की इस्रोबरोबर मिळून अंतराळवीरांसाठी हे जेवण बनवण्यात आले आहे. त्यांनी अशी माहिती दिली की अमेरिकन अंतराळवीर त्यांच्या चवीनुसार अंतराळात खाणं घेऊन जातात, रशियन अंतराळवीर देखील. त्यामुळेच भारतीय अंतराळवीरांच्या आवडीचा मेन्यू देखील तयार करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या मोहिमेसाठी निवड झालेले हवाई दलाचे वैमानिक रशियात प्रशिक्षण घेत आहेत. अवकाशात त्यांचा आहार कसा असावा, याविषयी लष्करी प्रयोगशाळेत गेल्या दोन वर्षांपासून अनेक अन्न घटकांवर संशोधन सुरू असून त्यातून वैविध्यपूर्ण ‘मेन्यू’ तयार झाला आहे.
रशियामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या भारतीय अंतराळवीरांना खाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. अंतराळातील हा प्रवास 7 दिवसांचा असणार आहे. चिकन बिर्याणी, चिकन कोरमा, शाही पनीर, वरण-भात, आलू पराठा, विशेष पद्धतीने तयार केलेली चपाती, दाल-मखनी, खिचडी असे अनेक पदार्थ यावेळी उपलब्ध असणार आहेत.
मेन्यूमध्ये असणारं खास आंब्याचं लोणचं हे म्हैसूरमधील डिफेन्स फूड रिसर्च लॅबमध्ये बनवण्यात आलं आहे. DFRLस्पेस फूड रिसर्च अँड लॉजिस्टिक विंगने गेल्या आठवड्यात यालाहंकामध्ये एरो-इंडिया 2021 उत्सवात त्यांची उत्पादनं सादर केली होती. यामध्ये मूग डाळ-भात, हलवा आणि अनेक प्रकारच्या चवीचे एनर्जी बार सादर करण्यात आले होते.