सोलापूर : राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आज शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे राबविण्यात आलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ सोलापूर या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः उपस्थित राहून प्राप्त 871 अर्जांपैकी 786 अर्जांवर सकारात्मक निर्णय घेतला. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचीही पत्रकार परिषदेत घोषणा केली.
मंत्री सामंत यांनी सांगितले की, शुक्रवारी प्रत्यक्ष उपस्थित 576 अर्जांपैकी 480 अर्ज सकारात्मकपणे निकाली काढण्यात आले. यामध्ये अनेक वर्षे प्रलंबित अनुकंपाच्या तीन प्रकरणांमध्ये आज नियुक्ती आदेश देण्यात आले. वैद्यकीय प्रतिपूर्ती दहा व्यक्तींना, भविष्य निर्वाह निधीचे अकरा व्यक्तींना आदेश देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आंतरविद्यापीठीय बदल्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये सुलभता आणल्यामुळे सोलापूर जिल्हा विनाअनुदानित तंत्रनिकेतन संघटनेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांचे आभार मानण्यात आले.
विद्यापीठामधील चार संविधानिक पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात येणार असून उर्वरित आकृतिबंधालाही लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून मदत करण्यात येणार असून विद्यापीठाने प्रस्ताव सादर केल्यास त्याला तत्काळ मंजुरी देण्यात येईल. सोलापूर येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या उपक्रमांतर्गत आलेल्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्था चालक, संघटना यांच्या तक्रारीवर प्रत्यक्ष चर्चा करून त्यांनी जागेवर निर्णय घेतले. तक्रारदारांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी, संचालक उपस्थित असल्याने तक्रारदारांच्या समस्या जागेवर सोडविण्यात आल्या. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, प्र. कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, उपसचिव दत्तात्रय कहार आदी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
* स्मारक समितीच्या पालकमंत्री अध्यक्ष तर कुलगुरू कार्याध्यक्षा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे या समितीचे अध्यक्ष तर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस समितीच्या कार्याध्यक्षा असतील. तसेच या स्मारकामध्ये शिल्पकृती उभारण्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, मुंबई येथील आणि इतर तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली उपसमिती गठीत केली जाणार आहे. सात जणांची ही उपसमिती कुलगुरू डॉ. फडणवीस या गठीत करतील. स्मारकासाठी शासनाकडून दीड कोटी तर विद्यापीठ फंडातून दीड कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकूण तीन कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.