सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव आप्पाराव कोरे (वय 78 वर्षे) यांचे आज शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उद्या शनिवार दि. 13 रोजी दुपारी 12.30 वाजता मंद्रुप येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोरे यांना सोलापुरातील यशोधरा हॅास्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना आज शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी 15 वर्षे मंद्रुप गावचे सरपंच व 5 वर्षे दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापतीपद व 15 वर्षे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद भूषवले.
गोपाळराव कोरे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोरगरीबांचे कैवारी म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात परिचित होते. काँग्रेस एकसंध असताना देशाचे नेते शरद पवार व सुशीलकुमार शिंदे या दोन्ही नेत्यांना श्रद्धास्थानी मानून त्यांनी 50 वर्षांपूर्वी समाजसेवेला प्रारंभ केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर कोरे यांनी खा.शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणे पसंद केले.
दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू म्हणून त्यांना सर्वच पक्षांच्या नेतेमंडळीमध्ये मानाचे स्थान होते. नेहमी गोरगरीब व गरजू लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे व्रत त्यांनी स्विकारले होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये मानाचे स्थान निर्माण केले होते. दक्षिण सोलापूर तालुक्याचे मासलीडर म्हणून तालुकावासिय त्यांना लोकनेते म्हणून संबोधित होते. तर संपूर्ण तालुक्यात ते काका या नावाने परिचित होते.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आप्पाराव कोरे,सोलापूर जिल्हा दूध संघाचे माजी संचालक प्रभाकर कोरे यांचे ते वडील व सोलापूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या विद्युलता प्रभाकर कोरे यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे.