जळगाव : राष्ट्रवादीत प्रवेश केलेले
दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटील मुक्ताईनगरमध्ये काल राष्ट्रवादी परिवार परिसंवाद यात्रेनिमित्त बोलत होते. जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे पुढील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवारच जाहीर केला. पुढील विधानसभेत रोहिणी खडसे यांना विजयी करण्यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकद लावणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रोहिणी खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या साथीनेच त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षप्रवेशा सोबतच राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत त्यांनी दिले होते. रोहिणी खडसे या भाजपच्या तिकीटावर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या.
एकनाथ खडसेंनी स्वतःसाठी भाजपकडे तिकीट मागितले होते, परंतु भाजपने त्यांचे तिकीट कापत रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली. रोहिणी खडसेंना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंना पराभूत केले होते.
रोहिणी खडसे खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. 15 टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं. त्यामुळे एकप्रकारे एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना आमदारकी देण्याचे संकेत राष्ट्रवादीने दिले.