परळी : पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर आता तिच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘पूजाच्या आत्महत्येवरून विनाकारण आमची बदनामी केली जात आहे. आमची ही बदनामी त्वरीत थांबवा नाही तर मी आत्महत्या करेन’, असा आक्रोश पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी केला. तसेच ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्या दिवशी पूजाशी बोलणं झालं होतं, असंही त्यांनी सांगितलं. माझ्यावर कोणताही दबाव नाही, असं ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर बंजारा समाज देखील एकवटल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी बंजारा समाजाची बदनामी केली जात असल्याचे बंजारा समाज मोर्चा आयोजकांनी म्हटले आहे.
या प्रकरणात अनेक तर्क-वितर्क लावले जात असून यावर लहू चव्हाण यांनी आज पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘खूप वाईट वाटलं. आम्ही तिथे साडेआठ-नऊच्या दरम्यान पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर कळालं की, पूजा आमच्यात नाही.’ असं सांगतानाच त्यांना अश्रू अनावर झाले होते.
पुढे त्यांनी आपली व्यथा देखील मांडली आहे. ‘मला बीपीचा त्रास आहे. त्यामुळे सर्व कामं, व्यवहार पूजा पाहायची. माझ्या मुलीच्या नावावर मी पोल्ट्री साठी कर्ज घेतलं होतं. जवळपास 17 ते 18 लाखांचं कर्ज होतं. लॉकडाऊनमुळे पोल्ट्री बंद झाली होती. त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईकांकडून पैसे घेऊन सावरण्याचा प्रयत्न केला. तर बर्डफ्लू आला. त्यामुळे पूजा तणावात होती. एवढे पैसे फेडायचे कसे? हा तिच्यासमोर प्रश्न होता.’ असं ते म्हणाले.
तर, ‘ बँकेचे मेसेज येत आहेत, हफ्ते भरायला सांगत आहेत. आम्ही कलेक्टरांना, तहसीलदारांना खूप निवेदनं दिली, पण कुणीच लक्ष दिलं नाही. लक्ष दिलं असतं तर माझी मुलगी गेली नसती. पूजा कधीच स्वतःचं दुःख दुसऱ्याला दाखवत नव्हती.’ तर, सद्या व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्सवर देखील त्यांनी संशय घेतला आहे.
* माझी मुलगी तर गेली ना, माझं काय आहे?
‘हे राजकारणंही असू शकतं. माझ्या मुलीला नाहक बदनाम केले जात आहे. कोणासोबत तरी माझ्या मुलीचं नाव जोडून काही लोक मुद्दामून आमची बदनामी करत आहेत. आमचा समाज म्हणतोय हे राजकारण आहे. माझी बदनामी होण्यासाठी. माझी मुलगी तर गेली ना, माझं काय आहे? पण आता बदनामी थांबवली पाहिजे. त्यांना काय मिळतंय, काय साधत आहेत? ज्याला दुःख झालंय त्याला हे आणखी दुखवत आहेत. आई-वडिलांची अवस्था काय आहे. तिची आई बेशुद्ध आहे. कोणाला काय सांगावं काहीच कळत नाही.’ अशी व्यथा मांडतानाच पुढील संसार कसा चालवायचा असा उभा राहिलेला प्रश्न देखील त्यांनी माध्यमांद्वारे सांगितला.