अहमदाबाद : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद, सूरत, राजकोट, वडोदरा येथे आज मध्यरात्रीपासून पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. मध्यरात्री 12 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. 28 फेब्रुवारीपर्यंत हा कर्फ्यू लागू असेल. दरम्यान महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढत असल्याने नियमांचे कडक पालन न केल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच राज्यात कोरोना विषाणू वाढत चालल्याने गुजरात राज्यातील चार शहरात नाईट कर्फ्यू लावला जातोय.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत चाललीय. त्यामुळेच अनेक राज्यांसमोर कोरोनावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचं आवाहन आहे. त्यातच आता कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता गुजरातमधील चार शहरांमध्ये पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. या शहरांमध्ये अहमदाबाद, वडोदरा, सूरत आणि राजकोटचा समावेश आहे. रात्रीच्या कर्फ्यूची वेळ एक तासाने कमी केली गेलीय, म्हणजे आता रात्री 12 ते सकाळी 6.00 अशी वेळ असणार आहे.
सोमवारी राज्याचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकज कुमार यांनी आदेश जारी केलेत. गुजरात सरकारने अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोटमध्ये दीर्घ काळापासून रात्रीचे कर्फ्यू लागू आहे. पूर्वी ही वेळ रात्री 11 वाजता प्रारंभ होत होती, आता 12 वाजता होणार आहे. नोव्हेंबरमध्ये दीपावलीनंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर सरकारने या चारही शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला होता. त्यानंतर 31 जानेवारीपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला. जो नंतर 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आला आणि आता 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविला.
* नवीन आकडेवारी, चिंता वाढली
नव्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना विषाणूची एकूण संख्या 1,09,16,589 आणि मृतांची संख्या 1,55,732 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत देशातील वेगवेगळ्या राज्यात कोरोना विषाणूचे 1,06,21,220 रुग्ण बरे झालेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचे रुग्ण बरे झाल्यानंतर देशात सध्या 1,39,637 सक्रिय रूग्ण आहेत.