भंडारा : महाराष्ट्रात अमिताभ बच्चन-अक्षय कुमार यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते भंडा-यात बोलत होते. ‘अमिताभ व अक्षय हे काँग्रेसचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या बाजुने व इंधन दरवाढीवर बोलत होते. मात्र आता ते गप्प आहेत, त्यांनी आपली भूमिका मांडावी, तसे न झाल्यास आम्ही त्यांच्या चित्रपटांचे शुटिंग बंद पाडू’, असे पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा सक्त इशारा नाना पटोले यांनी दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* इंधन दरवाढीवरून टीव टीव करणारे सुपरस्टार गप्प का?
देशात आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पण तरीही इंधन दरवाढीवरून कोणी बोलायला तयार नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून टीव टीव करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार आता गप्प का आहेत? आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी कालच केला होता.
* विरोधात बोलण्याची त्यांची हिंमत होत नाही का?
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्याचवेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावरही टीका केली. यूपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते. त्यावेळी 70 रुपये लिटर पेट्रोल झाले तेव्हा अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिंमत होत नाही का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. मोदी सरकारने इंधन व गॅस दरवाढ तात्काळ कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.