पंढरपूर : माघी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकादशी दिवशी पंढरपूर शहर व परिसरातील दहा गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तरीही काही मठचालक बाहेरगावाहून आलेल्या वारक-यांना रुम देत आहेत. या मठचालकांना पोलीस प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. तात्काळ मठ रिकामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उद्या रविवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने मठांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या मठात भाविक आढळतील त्या मठ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माघी याञेच्या नियोजनासाठी अतुल झेंडे यांनी पोलीस प्रशासनाची आज बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार, पो नि प्रशांत भस्मे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले यात्रेसाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीन डीवाय एस पी, ९० पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ८०० पोलीस कर्मचारी ६०० होमगार्ड, एक आरसीएफ व एक एसआरपीएफची तुकडी असा बंदोबस्त आहे.
बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनी पंढरपूर शहरातमध्ये येवु नये यासाठी तीनस्तरीय नाकाबंदी करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांसाठी बससेवा सुरु राहणार असल्याचेही अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.