सोलापूर : शहरातील कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेने मंगलकार्यालय, हॉटेल, जीम, बागा, कोचिंग क्लास व दुकानांमध्ये नियमापेक्षा जास्त गर्दी आढळल्यास दंड व एक महिन्यासाठी दुकानाला सील ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मिरवणुका, यात्रा, स्पर्धा, मोर्चा उपोषण व सामूहिक कोणत्याही कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली आहे.
सर्व खाजगी दवाखान्याची तपासणी होणार आहे. अशा दवाखान्यात सर्दी, पडसे, खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णाची चाचणी करण्यात येईल. कोव्हीड सेंटरमधील व्हेंटीलेटर तयारी व इतर सुविधांची पाहणी करण्यात येईल. संपर्कातील व्यक्तींची तपासणी कडकपणे करण्यात येईल.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काल शुक्रवारी रात्री उशिरा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये नवे निर्बंध लागू केले आहेत. मंगलकार्यालयात होणा-या लग्न व इतर समारंभाची विभागीय कार्यालयाने दररोज तपासणी करावी. लग्नाला परवाना बंधनकारक असून, ५० लोकच आहेत की नाही याची खातरजमा करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास नोटीसा देऊन १० हजार दंड करावा.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दुस-यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगलकार्यालय महिन्यासाठी सील करावे असे आदेश दिले आहेत. कोंचींग क्लासलाही हा नियम लागू करण्यात आला आहे. बाजार समिती, मंडई, माल्स, शॉपिंग सेंटरमधील दुकानदार, फेरीवाल्याना कोरोना चाचणी बंधनकारक असेल व त्यांनी मास्क, फिजिकल डिटस्टन्सचे पालन करणे बंधनकारक असेल. ज्या ठिकाणी उल्लंघन दिसेल त्यांना दोन हजार दंड व दुस-या वेळेस प्रकार आढळल्यास दुकान एक महिन्यासाठी सील करण्यात येईल. त्याचबरोबर दररोज रेल्वे, बसस्थानक, जीम, उद्यान, क्रीडा स्पर्धांची मैदाने, चित्रपटगृह, हॉटेल, बारची तपासणी करण्यात येईल. जेथे नियमांचे उल्लंघन आढळेल त्यांना १० हजार दंड व दुस-यावेळेस महिन्यासाठी आस्थापना बंद करण्यात येईल. लहान मुले व ज्येष्ठांनी घरातच रहावे.
* अशी आहे गर्दीची नियमावली
मिरवणुका, स्पर्धा, यात्रा, मोर्चा, उपोषण व इतर सामुहिक कार्यक्रमास बंदी असेल. पार्थनास्थळे, मंदिर, चर्चमधील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम सुरू असतील. श्री सिद्धेश्वर मंदिरात दररोज ५०० भाविकांना प्रवेश देण्यास परवानगी असेल तर मठांमध्ये २० जणांना परवानगी असेल. शासकीय कार्यालयातही गर्दी करता येणार नाही. निवेदनासाठी फक्त ५ व्यक्तींना परवानगी असेल. संबंधित विभागाचे अधिकारी दररोज या नियमांची तपासणी करून कारवाई करतील.