मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक सभेविषयी अनेक मोठे खुलासे केले आहेत. शरद पवार यांच्या पावसातील सभेनंतर राज्यातील लाखो लोकांच्या स्टेटसला लागलेला फोटो कसा आणि कुणी काढला हे सांगताना त्यांनी त्या दिवशीचा मजेदार किस्सा सांगितला. तसेच फोटो काढणाऱ्या कॅमेरामनने आपल्या दीड लाख रुपये भरुन देण्याबाबत कशी विचारणा केली हेही सांगितलं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शरद पवार यांची साताऱ्यातील सभा पावसात झाली आणि यशस्वी झाली. त्या ठिकाणी माध्यमांचा एकही माणूस नव्हता. पाऊस झाल्याने सभा होणार नाही, रद्द होईल असा विचार करुन सर्व पत्रकार निघून गेले होते. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा मीडिया सेलचा माणूस तेथे होता. त्याने शशिकांत शिंदेंना फोन केला सभा होणार आहे की नाही. त्यावर शशिकांत शिंदेंनी सभा होणार आहे असं सांगितलं. तो म्हणाला माझा कॅमेरा दीड लाख रुपयांचा आहे. पावसात माझा कॅमेरा खराब झाला तर तुम्हाला द्यावा लागेल असं तो कॅमेरावाला म्हणाला. शशिकांत शिंदेंनी कॅमेरा भरुन देण्याचं आश्वासन देत शुटिंग करायला सांगितली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“तो कॅमेरामन दीड लाख रुपयांचा कॅमेरा पावसात घेऊन काळजीने बसला आणि या देशातला टर्निंग पॉईंटचा सर्वात मोठा फोटो त्या कॅमेरावाल्याला मिळाला. नियतीच्या मनात काय असतं ते कुणालाही माहिती नसतं. त्यामुळे एखाद्या चांगल्या कारणासाठी तुम्ही लढला तर त्याचा परिणाम चांगला होता,” असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
* कपाळा लावला हात
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “साताऱ्यात शरद पवार यांची सभा होती तेव्हा मला शशिकांत शिंदे यांचा फोन आला. त्यांनी ताई मी सॉरी म्हणायला फोन केलाय असं सांगितलं. मला काळजी वाटली, कशाबद्दल सॉरी हे कळालं नाही. मी काय झालंय हे विचारलं. ते म्हणाले आम्ही सभा केली आणि साहेब त्यात पूर्ण भिजले. मी कपाळाला हात लावला. मी कपाळाला हात लावून त्यांना सांगितलं माझे वडील 80 वर्षांचे आहेत, पायाला जखम झालीय. मी आणि शरद साहेबांनी ठरवलं लढेंगे तो पुरी ताकदसे लढेंगे, नही तो नही.”