अमरावती : विनामास्क बुलेटवारी आणि नियमाचा भंग करून शिवजयंती साजरी करणे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना भोवले. या प्रकरणी राणा दाम्पत्यासह 15 जणांवर फ्रेजरपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अटी नियमांचा भंग करणे, मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिगचे पालन न करणे, सॅनिटायजरचा वापर न करणे याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात जमावबंदीची आणि वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार विवाह सोहळे आणि सामाजिक कार्यक्रमांवर 50 पेक्षा कमी लोकांची मर्यादा ठेवण्यात आली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, शुक्रवारी शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा बुलेटवर विना मास्क कार्यक्रम स्थळी पोहचले. कार्यक्रमात विना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा भंग त्यांनी केला होता. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचं फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले. दंडाची कारवाई महानगर पालिका करेल असंही ते म्हणाले.अमरावती महानगर पालिकेकडून अद्याप दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. सखोल तपास करून त्यासंदर्भातला निर्णय घेण्यात येईल अमरावती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.
आमदार रवी राणा म्हणाले, “आम्ही शिवजयंती साजरी करण्याचा गुन्हा केल्यासारखं वाटतंय. आम्ही शिवजयंती साजरी केली मोठा कार्यक्रम करायचा होता. पण कोरोनाची लाट बघता छोटेखानी शिवजयंती साजरी केली. तरीही आमच्यावर गुन्हा दाखल झाला. आता शिवजयंती साजरी करायची नाही, असा जर आदेश सरकारकडून आला असेल आणि त्या आदेशानुसार जर गुन्हा दाखल झाला असेल तर काय म्हणावं.”
“शिवजयंती साजरी करणे, हार अर्पण करणे हा जर सरकारच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून, विरोधकांनी गुन्हा दाखल करून घेतला असेल तर शिवाजी महाराजांसाठी असे 10 गुन्हे आम्हाला मान्य राहील,”
रवी राणा – आमदार