मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत शंका घेत जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असा इशारा मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. अमरावतीत कोरोनाच्या जास्त टेस्ट घ्यायच्या आणि कोरोना वाढल्याचे सांगायचे. राज्यात कोरोनाचे असे कुठले आकडे वाढले आहेत, हा प्रश्न आहे. विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायचे नसेल तर नका घेऊ. मात्र, कृपया जनतेला भीती घालू नका, असेही मनसेने म्हटले आहे.
अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोपही देशपांडेंनी केला.
“सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“मुख्यमंत्री साहेबाना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का? तुम्हाला घरी बसायचं आहे तर बसा पण लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नका.” असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं.
“फक्त अचानक अमरावतीमध्ये आकडे कसे वाढले? अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? हा तर सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्याचं मुख्यमंत्र्यांना काही वाटत नाही का?” असंही संदीप देशपांडेंनी विचारलं.
“ग्रामपंचायत निवडणुका, शिवसेना-काँग्रेसची आंदोलनं झाली, तेव्हा कोरोना नव्हता का? लोकांना फक्त फसवलं जात आहे” असंही संदीप देशपांडे म्हणाले.