मुंबई : ‘हे मन बावरे’ या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मंदार म्हणाले, की ‘ मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे. मी वाईट माणूस नाही. पण मी अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे. मला खूप लॉस झाला आहे. पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन, अगदी टॅक्ससकट. फक्त मला थोडा वेळ हवा आहे’.
मराठी मालिका विश्वात दबदबा असलेले प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मीसुद्धा बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे, असं स्पष्टीकरण देवस्थळी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे.
2000 मध्ये त्यावेळच्या अल्फा मराठीवर गाजलेल्या ‘आभाळमाया’ मालिकेचं दिग्दर्शन मंदार देवस्थळी यांनी केलं होतं. ‘बोक्या सातबंडे’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’, ‘जिवलगा’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘फुलपाखरु’, ’गुलमोहर’, ‘हे मन बावरे’ अशा एकापेक्षा एक मालिका गाजल्या आहेत.
‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे मानधन थकवल्याचा आरोप शर्मिष्ठा राऊतने इन्स्टाग्राम पोस्टमधून केला आहे. त्यानंतर देवस्थळींनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे.
* मंदारची फेसबुक पोस्ट?
“नमस्कार, मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे, माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचं पेमेंट थकलं आहे, तुमचं म्हणणं योग्यच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात, पण मीसुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे, मला खूप लॉस झाला आहे, त्यामुळे आता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही, पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन, अगदी टॅक्ससकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे, कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही, तशी माझी इच्छाही नाही, पण आत्ता माझ्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळलंय. मी खरंच वाईट माणूस नाही, माझी परिस्थिती वाईट आहे, मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना… आतापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे, आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो” असं मंदार देवस्थळी यांनी लिहिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेली 13 वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. आजही आणि यापूर्वी पण कायम चॅनेलने आम्हाला मदत केली. परंतु एक प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळीने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले. हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकतं! प्लीज घाबरु नका, बोला.. please support & Pray for US.. #support # चळवळ” असे आवाहन शर्मिष्ठाने पोस्टच्या माध्यमातून केले आहे.
शर्मिष्ठा राऊत कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत सहाय्यक भूमिकेत होती. शशांक केतकरने साकारलेल्या सिद्धार्थच्या बहिणीची म्हणजेच संयोगिताची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. शर्मिष्ठा राऊत बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्रीने सहभागी झाली होती. तिने अंतिम फेरीपर्यंत मजलही मारली होती. शर्मिष्ठाची भूमिका असलेल्या मन उधाण वाऱ्याचे, उंच माझा झोका, सुखाच्या सरींनी हे मन बावरे यासारख्या मालिका गाजल्या आहेत. शर्मिष्ठा लॉकडाऊनच्या काळात विवाहबंधनात अडकली.