सोलापूर : पदवी प्राप्त करणे ही जीवन शिक्षणाची केवळ सुरुवात आहे. युवकांनी डोळ्यांपुढे मोठे लक्ष्य ठेवावे, निवडलेल्या क्षेत्रात नवसृजन करावे व ध्येयसिद्धीसाठी कठोर परिश्रम करावे. देशासाठी परिश्रम केले तर त्यात आपले हित आपसूकच साधले जाईल. युवकांनी परिश्रमांना सदाचाराची जोड दिल्यास सशक्त, समर्थ व आत्मनिर्भर भारत निर्माण करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. यावेळी सर्वाच्या अंगावरील ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील बाराबंदी उठून दिसून येत होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत सोहळा आज सोमवारी ऑनलाइन पार पडला. यावेळी राजभवनातून राज्यपाल कोश्यारी यांनी सहभाग नोंदवत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा हे उपस्थित होते.
राज्यपालांनी ‘सदाचार हा थोर सांडूं नये तो, जनीं तोचि तो मानवी धन्य होतो’ हे समर्थ रामदास यांचे वचन उद्धृत केले. ते म्हणाले समाजात कित्येकदा मोठमोठ्या लोकांचे नैतिक अध:पतन झालेले दिसते, त्यामुळे युवकांनी सद्गुणी व सदाचारी लोकांची संगत ठेवल्यास जीवन सफल होईल.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी स्वावलंबनाचा विचार दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर करण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भरतेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी नवसंशोधनाला प्राधान्य द्यावे. कोरोनाने जगाला वेढले असून अशा परिस्थितीमध्ये देशाने लस निर्मितीत पुढाकार घेतला, ही अतिशय उत्तम बाब आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भगवान श्रीराम आणि गौतम बुद्धांच्या या देशात आपण त्यांचा आदर्श आजही घेतो, त्याचे कारण त्यांचा सदाचार हे आहे. कोणतीही गोष्ट परिश्रमाशिवाय साध्य होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात तरुणांनी निराश न होता समर्थ रामदासांनी सांगितलेला सदाचाराचा वसा घेऊन पुढे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विद्यापीठाने कोरोनाला दूर ठेवण्यास फोर इन वन उपकरण विकसित केले, मास्क निर्मितीही केली, त्याचे कौतूकही त्यांनी केले.
सुवर्ण पदक तसेच पीएचडी प्राप्त स्नातकांचे अभिनंदन करताना युवकांनी मुद्रा, स्टार्ट अप इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आदी योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे, अशी सूचना राज्यपालांनी आपल्या भाषणात केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे केवळ सोलापूर या एका जिल्ह्यासाठी कार्यरत असलेले राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे असे नमूद करून विद्यापीठाने विडी कामगार व वस्त्रोद्योग कामगारांच्या कौशल्य वर्धनासाठी प्रयत्न करावे अशी सूचना माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी केली.
सोलापूर जिल्ह्यातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात इतरत्र स्थलांतर होते. हे स्थलांतर थांबविण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या, सोलापूर हे आरोग्य सेवेचे मोठे केंद्र व्हावे, जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन क्षेत्रे अधिक प्रकाशात यावी व कृषी पर्यटनाला चालना मिळावी, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कौशल्य विकासाचे 92 अभ्यासक्रम राबविले जात असून विद्यापीठातर्फे कम्युनिटी रेडिओ, अर्थशास्त्र प्रयोगशाळा व पुरातत्व संग्रहालय निर्माण करण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी आपल्या अहवालामध्ये दिली.
यावेळी चार गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके तर 4 स्नातकांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यापीठ स्तरावर जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट शैक्षणिक संस्था, उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी हे पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार श्रेणीक शाह यांनी मानले.