नवी दिल्ली : व्यावसायिक आणि सोनिया गांधींचे जावई तथा प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी आज सोमवारी चक्क दिल्लीच्या रस्त्यांवर सायकल चालवताना दिसले.
आज सोमवारी, आपल्या एसी गाडीला बाजुला ठेवत सायकलवर स्वार होत आपल्या कार्यालयात पोहचण्याचा निर्णय रॉबर्ट वाड्रा यांनी घेतला. दिल्लीतल्या खान मार्केटपासून आपल्या कार्यालयापर्यंत ते सायकल चालवत पोहचले. या दरम्यान त्यांचा स्टाफही त्यांच्यासोबत होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमवारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल केले नाहीत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोलसाठी ९०.५८ रुपये प्रती लीटर तर डिझेलसाठी ८०.९७ रुपये प्रती लीटर मोजावे लागत आहेत. मात्र, देशातील अनेक भागांत पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.
* पंतप्रधानांनी एसी गाडीतून बाहेर निघून पाहावे
रॉबर्ट वाड्रा यांनी पेट्रोल – डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवरून मोदी सरकारवर निशाणाही साधलाय. सामान्य जनता कशी हैराण झालीय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या एसी गाडीतून बाहेर निघून पाहायला हवं. हे चित्रं पाहून तरी ते पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करतील, असंही वाड्रा यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रत्येक अपयशाचं खापर आधीच्या सरकारवर फोडत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे, असं म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी टीका केलीय. सामान्य व्यक्ती आज मोठ्या संकटात आहे. त्यांचं दु:ख आज मला जाणवतंय. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यानं आज लोक रस्त्यावर आले आहेत, असंही रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं.