सांगली : भाजपकडे असणारी सांगली मिरज कुपवाड महापालिका आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले आहेत. भाजपच्या धीरज सूर्यवंशी यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या रणनितीमुळे राष्ट्रवादीचा विजय झाला, असे बोलले जात आहे. दिग्विजय यांना 39 मते पडली. भाजपच्या धीरज यांना 36 मते मिळाली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपला आस्मान दाखवलं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे.
महापौर, उपमहापौर निवडीवरुन भाजपमध्ये कुरबुरी सुरु होत्या. गेल्या बुधवारी सायंकाळी महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचे नाव निश्चित झाले. भाजपची नावे निश्चित होताच राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. त्यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू केले.
राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.
चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली.
* सत्ताधारी भाजपमध्ये फूट
महापौर-उपमहापौर निवडीवरुन सांगलीत सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. नऊ नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आणि ते नॉट रिचेबल झाले होते. बैठकीला 30 ते 32 नगरसेवकच उपस्थित होते. त्या रात्री तीन नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखण्यात भाजपला यश आले. त्यानंतर रात्री उशिरा तीस नगरसेवकांना गोवा सहलीवर पाठवण्यात आले होते.