सोलापूर : कोरोनाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढून सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी गेल्या दहा महिन्यापासून शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कोरोना लस घेऊनही लागण झाले. त्यानंतर सोलापूरचे शंभरकरही लस घेऊन दुस-यांदा बाधित झाले आहेत.
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोवॅक्सिन लशीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होता. संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी व काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ते सध्या सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार १९ फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन सभागृहात आढावा बैठक बोलविली होती. मात्र बैठकीपूर्वीच त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना बैठक घेण्यास सांगितले. जास्त त्रास होऊ लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
21 तारखेला उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह आले. ते प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घरी उपचार घेत आहेत.
“सर्व सोलापूर जिल्हावासियांनी मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करून कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करावे, स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी.”
मिलिंद शंभरकर – जिल्हाधिकारी