सोलापूर : मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार निलय डागा यांच्या सोलापुरातील उद्योग कार्यालयावर तसेच घरावर केंद्रीय प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. सोलापुरातील त्यांच्या घरातून तब्बल आठ कोटींची रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान, देशभरातील हा व्यवहार शेकडो कोटींपर्यंत असण्याची शक्यता प्राप्तीकर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी वर्तविली आहे. 18 फेब्रुवारीपासून सोलापूर व भोपाळ आयकर विभागाची संयुक्त कारवाई सुरू आहे. या कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांची रोखड आयकर विभागाच्या हाती लागली आहे.
देशभरात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये त्यांच्या सुमारे 20 ऑईल मिल (खाद्यतेल) कंपन्या आहेत. करभरणा टाळण्यासाठी त्यांनी ऑनलाईन नव्हे, तर ऑफलाईन (रोखीने) व्यवहार केल्याबद्दल त्यांच्या कंपन्यांवर एकाचवेळी छापा टाकण्यात आला.
आमदार निलय डागा यांचे सोलापुरात अनेक नातेवाईक आहेत. त्यांचेही वेगवेगळे उद्योगधंदे आहेत. या कारवाईशी संबंधित त्यांच्या उद्योगाची आणि आर्थिक व्यवहाराची देखील तपासणी केली जाऊ शकते, या भीतीने बैतुल यांच्या नातेवाईकांचेही धाबे दणाणले आहेत. आमदार डागा यांचे देशभरात विविध उद्योग समूह आहेत. या सर्व ठिकाणी एकाच वेळी कारवाई होत आहे. जवळपास 100 कोटींची रोकड जप्त होऊ शकते, असा अंदाज यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस आमदार निलय डागा यांच्या उद्योग समूहाने कोट्यवधी रुपयांचा कर बुडवून व्यवसाय करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला आहे. सोलापूर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास मनाई केली आहे. कारण त्यांचा अजूनही तपास सुरू आहे आणि बैतुल ऑइल मिलमध्ये कारवाई सुरू आहे. गुरुवार 18 फेब्रुवारीपासून आजतागायत 22 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 8 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. आमदार निलय डागा यांच्या देशभरातील विविध उद्योग समूहावर एकाच वेळी आयकर विभागाची ही कारवाई सुरू आहे. ही सर्व रक्कम रविवारीच स्टेट बँकेच्या ट्रेजरी शाखेत आयकर विभागाच्या शासनाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
आमदार निलय डागा यांची महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात चिंचोली एमआयडीसीत ऑईल मिल आहे. प्राप्तीकर विभागाचे उपसंचालक व त्यांच्या पथकाने सोलापुरातील डागा यांच्या घरावर शनिवारी ( 20 फेब्रुवारी ) छापा टाकला. त्यावेळी त्यांच्या घरात साडेसात कोटींची रोकड मिळाली. नोटा मोजण्याच्या मशिनद्वारे रोकड मोजण्यात आली. रक्कम बँकेत जमा करण्यासाठी सुट्टीतही बँका सुरु ठेवाव्या लागल्या, असे एका वरिष्ठ अधिकार्याने खासगीत सांगितले आहे.
* लवकरच अधिकृतपणे माहिती जाहीर
ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर त्यावर ठराविक टक्क्यांमध्ये प्राप्तीकर भरणे बंधनकारक आहे. मात्र ऑनलाईन व्यवहार कमी दाखवून रोख स्वरुपातच सर्वाधिक व्यवहार या कंपन्यांकडून सुरु होते, अशीही चर्चा आहे. खाद्यतेल विक्रीतून मिळालेली रक्कम आणि कच्चा माल खरेदीची रक्कम यातील बहुतांश व्यवहार रोखीनेच केले जात होते, असेही सूत्रांनी सांगितले. आता देशभरातील सर्व कंपन्या तथा त्यांच्या घरातून जप्त केलेली रक्कम प्राप्तीकर विभागाने जप्त केली आहे. त्याबाबत प्राप्तीकर विभागातील वरिष्ठ अधिकारी लवकरच अधिकृतपणे माहिती जाहीर करतील, असेही सांगण्यात आले. ही कारवाई केंद्रीय स्तरावरील आदेशानुसार केल्याची चर्चा आहे
* बॅग घेऊन पळून जाण्याचा प्रकार
आमदार डागा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांच्या घरातील एका कर्मचार्याला बॅग घेऊन पळून जाताना प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्यांनी पकडले. त्यानंतर दुसरी बॅगही अधिकार्यांना मिळाली. डागा यांच्या घरात एवढी मोठी रक्कम आली कुठून, याचे उत्तर कोणीही देऊ शकले नाही. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने ती रक्कम जप्त केली. दरम्यान, डागा यांच्या देशभरातील कंपन्यांनी हवालाच्या माध्यमातून पैसे पाठवल्याचे आणि वेळोवेळी मागविल्याचे पुरावेही यावेळी प्राप्तीकर विभागाला मिळाल्याचे सांगण्यात आले.