मुंबई : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटीच्या थकबाकीपोटी २७ हजार कोटी बाकी आहे. त्याचा परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पावर होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, अर्थ मंत्रालयाने महाराष्ट्राला जीएसटीची ११ हजार ५१९ कोटी वितरित रक्कम महाविकास आघाडी सरकारने विकास कामांना गती देण्यासाठी वापरावी व प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकावर फोडणे बंद करावे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला GST चे ११ हजार ५१९.३१ कोटी दिलेले आहे. त्यामुळे आता तरी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने कोरोना संसर्गात उपाययोजनांसाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वापरावेत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्राने महाराष्ट्राला GST च्या थकबाकीपोटी २७ हजार कोटी येणे बाकी आहे, त्यामुळे त्याचा परिणाम यंदाचा राज्याच्या अर्थसंकल्पावर होईल, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार नुकताच केला होता.
यावर आता पाटील यांनी उत्तर देताना ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. पाटील म्हणाले की, प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर खापर फोडायचे आणि जीएसटीच्या थकबाकीचे कारण सांगून आपली जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचे काम नेहमीच महाविकास आघाडी सरकार करीत आहे, असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
यावर बोलताना पाटील म्हणाले की, “गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गेल्या ४ महिन्यात म्हणजे ऑक्टोबर २०२० पासून राज्य व केंद्र शासित प्रदेशांना जीएसटीच्या पोटी १ लाख कोटी रुपये वितरित केले आहेत. अर्थ मंत्रालयाने देशातील २८ राज्ये व तीन केंद्र शासित प्रदेशांना जीएसटी परताव्याची रक्कम वितरित केली आहे. त्यापैकी महाराष्ट्राला मिळालेली जीएसटीची रक्कम ही दुसऱ्या क्रमांकाची आहे असे त्यांनी बोलून दाखविले.